हिंगोलीत पणन महासंघाची ११९ क्विंटल कापूस खरेदी

कापूस खरेदी
कापूस खरेदी
परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाकडे कापूस विक्रीसाठी आॅनलाइन नोंदणी केलेल्या ३९० शेतकऱ्यांपैकी हिंगोली येथील केंद्रावर १० शेतकऱ्यांच्या ११९ क्विंटल कापूसाची खरेदी करण्यात आली. शनिवारपर्यंत (ता. २३) परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पणन महांसघ, सीसीआय आणि खासगी अशी एकूण ५ लाख १० हजार ४९१ क्विंटल कापूस खरेदी झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यंदाच्या कापूस खरेदी हंगामात हमीभावाने (प्रतिक्विंटल ४३२० रुपये) कापूस खरेदी करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील परभणी आणि ताडकळस येथे, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली आणि हयातनगर येथे कापूस उत्पादक पणन महासंघाची खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. या केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्यांना संबंधित बाजार समितीकडे आॅनलाइन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले होते.
परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ८० शेतकऱ्यांनी, ताडकळस येथे ७० शेतकऱ्यांनी, हिंगोली येथे १६५ शेतकऱ्यांनी, वसमत येथे ७९ शेतकऱ्यांनी अशी दोन जिल्ह्यांतील एकूण ३९० शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली.
सुरवातीच्या काळात काही ठिकाणी हमीदरापेक्षा कमी दराने खरेदी केली जात असल्यामुळे तसेच पणन महासंघाकडे कापूस घातल्यास बोनस मिळेल या अपेक्षेने हिंगोली येथील पणन महासंघाच्या खरेदी केंद्रांवर १० शेतकऱ्यांनी ११९ क्विंटल कापूस विक्री केला आहे. सद्यःस्थितीत खुल्या बाजारातील कापूस दराने साडे पाच हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
परभणी जिल्ह्यात सीसीआय आणि खासगी खरेदीदार यांची मिळून एकूण ४ लाख ८९ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. यामध्ये परभणी येथे ३६ हजार ६७०, जिंतूर येथे ५० हजार ७५८, बोरी येथे ३ हजार २०२, सेलू येथे १ लाख ८३ हजार, मानवत येथे १ लाख २९ हजार ४३, पाथरी येथे २६ हजार ६४१, सोनपेठ येथे २६ हजार ८९४, गंगाखेड येथे २३ हजार ५७२, पूर्णा येथे ४८९, ताडकळस येथे ९ हजार २४० क्विंटल कापूस खरेदीचा समावेश आहे.
हिंगोली जिल्ह्यात हिंगोली येथे ६ हजार ९४२, हयातनगर येथे १ हजार ८९४, जवळा बाजार येथे २ हजार ५८०, आखाडा बाळापूर येथे ९ हजार ३७५ अशी एकूण २० हजार ७९१ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. खाजगी कापूस खरेदी प्रतिक्विंटल ४ हजार ५४० ते ५ हजार २२० रुपये दर मिळाले. शनिवार (ता. २३) पर्यंत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात एकूण ५ लाख १० हजार ४९१ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com