देशातील कापूस उत्पादन घटणार

देशातील कापूस उत्पादन घटणार
देशातील कापूस उत्पादन घटणार

मुंबई (कोजेन्सिस) : भारतात यंदाच्या हंगामात कापसाच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत १.७ टक्के घट होईल, असा अंदाज अमेरिकी कृषी विभागाने (यूएसडीए) वर्तवला आहे. यंदाच्या हंगामात ३६५ लाख गाठी कापूस उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात ३७२ लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते. मॉन्सूनला झालेला उशीर आणि लागवडक्षेत्रात झालेली घट यामुळे उत्पादनात घट अपेक्षित असल्याचे `यूएसडीए`ने म्हटले आहे.

यंदा मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर सुरवातीच्या काळात पावसाने दिलेली ओढ आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याची धास्ती यामुळे शेतकऱ्यांनी कापसाऐवजी इतर पिकांना पसंती दिली. प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्र या महत्त्वाच्या राज्यांंमध्ये कापूस लागवडीत मोठी घट दिसून आली.

महाराष्ट्रात अकोला आणि नागपूर जिल्ह्यांत कापूस पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेतच बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाले. त्यामुळे यंदा राज्यातील कापूस उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत पावसाच्या वाढत्या प्रमाणाचा अंदाज लक्षात घेता `यूएसडीए`ने कापूस उत्पादकता गेल्या वर्षीच्या प्रतिहेक्टर ५०७ किलोवरून यंदा ५२६ किलोवर पोचण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

गुजरातमध्ये देशातील सर्वाधिक कापूस पिकवला जातो. तिथे यंदा १० ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार २७ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झालेली होती. गेल्या वर्षी तिथे २६ लाख हेक्टरवर कापूस लावण्यात आला होता. महाराष्ट्रात कापूस लागवड गेल्या वर्षीच्या ४१.१ लाख हेक्टर वरून ३९.७ लाख हेक्टवर उतरली आहे.

`यूएसडीए`च्या अंदाजानुसार यंदाच्या हंगामात कापसाचा ओपनिंग स्टॉक १६४ लाख गाठी राहण्याची चिन्हे आहेत. गेल्या हंगामात १४४ लाख गाठी ओपनिंग स्टॉक होता. यंदा २०.५ लाख गाठी कापूस आयात होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात २२ लाख गाठी कापूस आयात झाला होता.

मागणीच्या आघाडीवर यंदा गिरण्यांची गरज ३२१ लाख गाठी कापूस इतकी राहण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात ३०८ लाख गाठी कापूस गिरण्यांनी घेतला होता. कापूस निर्यात गेल्या वर्षीच्या ६५ लाख गाठींवरून यंदा ५४ लाख गाठींवर घसरण्याचा अंदाज आहे.

 
 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com