नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता प्रतिहेक्टरी ८ क्विंटल ३१ किलो

कृषी विभागातर्फे गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी प्रभावीपणे जनजागृती मोहीम राबविण्यात आली शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने तसेच वेळीच कीड व्यवस्थापन केले. त्यामुळे कपाशीच्या उत्पादकता वाढीस मदत झाली. - रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड
कापूस उत्पादकता
कापूस उत्पादकता

नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप हंगामात कपाशीची उत्पादकता प्रतिहेक्टरी सरासरी ८ क्विंटल ३१ किलो (एकरी ३ क्विंटल ३२ किलो) एवढी आली आहे. जिल्ह्याच्या गेल्या पाच वर्षांतील कपाशीच्या प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकतेपेक्षा यंदाची उत्पादकता २ क्विंटल ५१ किलोने जास्त आली आहे. परंतु दुष्काळी स्थितीमुळे देगलूर, उमरी, हदगांव या तीन तालुक्यांची उत्पादकता सरासरीपेक्षा कमी आली आहे. संयुक्त पीक कापणी प्रयोगांच्या निष्कर्षाच्या विश्लेषणानंतर हे आढळून आले. या संदर्भात कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली. यंदा कपाशीची उत्पादकता काढण्यासाठी कृषी, महसूल, ग्रामविकास विभागातर्फे नांदेड जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांमध्ये ५८८ पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ५८६ पीक प्रयोगाचे निष्कर्ष विश्लेषित करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्याची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ८.३१ किलो (एकरी ३.३२ क्विंटल) आल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्याची २०१३ ते २०१७ या पाच वर्षांतील कपाशीची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता ५ क्विंटल ७९ किलो आहे. सरासरी उत्पादकतेपेक्षा यंदाची उत्पादकता २ क्विंटल ५१ किलोने जास्त आहे. यंदा रुईचे प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादन २ क्विंटल ९१ किलो आले आहे. जिल्ह्यातील सोळा तालुक्यांपैकी देगलूर, उमरी, हदगांव या तालुक्यांची कपाशीची उत्पादकता सरासरी उत्पादकतेपेक्षा ७३ किलो ते २.९९ क्विंटलने कमी आली आहे. उमरी तालुक्यात एकरी ९४ किलो, देगलूर तालुक्यात एकरी १ क्विंटल १३ किलो, हदगाव तालुक्यात एकरी २ क्विंटल २६ किलो आली आहे. अर्धापूर तालुक्यात प्रतिहेक्टरी सर्वाधिक म्हणजेच १७ क्विंटल १४ किलो (एकरी ६ क्विंटल ८५ किलो) एवढी तर उमरी तालुक्यात सर्वात कमी प्रतिहेक्टरी २ क्विंटल ३५ किलो (एकरी ९४ किलो) एवढी उत्पादकता आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com