कापूस संशोधन संस्थेचे एचटी बियाण्याकडे दुर्लक्ष

कापूस संशोधन संस्थेचे एचटी बियाण्याकडे दुर्लक्ष
कापूस संशोधन संस्थेचे एचटी बियाण्याकडे दुर्लक्ष

नागपूर :"हर्बीसाईड टॉलरंट' (एचटी) जनुकाचा समावेश असलेल्या बियाण्याचे प्रकरण फेब्रुवारी महिन्यातच समोर आले होते. याचा नमुना हा शेतकऱ्याकडून आला होता. यामुळे ही बाब केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने (सीआयसीआर) फारशी गांभीर्याने घेतली नाही. पुढे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आणि त्याचा फटका राज्यातील कापूस उत्पादकांना बसला, असा दावा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.

एचटी जीनचा समावेश असलेल्या तंत्रज्ञानाला जेनेटीक अप्रायझल इंजिनिअरींग कमिटीने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या संदर्भाने सुरू असलेल्या चाचण्यांनाही ब्रेक लागला. केंद्रीय कापूस संशोधन संस्था तसेच औरंगाबाद, जालना परिसरातील एका खासगी कंपनीकडे या तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या बियाण्याच्या चाचण्या सुरू होत्या. त्यानंतरही एकट्या यवतमाळ जिल्ह्यात सुमारे 25 लाख पाकीट हर्बीसाईड टॉलरंट बियाण्यांची विकल्या गेली, असे निरीक्षण केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने नोंदविले आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर बियाणे पोचले कसे? इतक्‍या मोठ्या प्रमाणात हे बियाणे मान्यतेशिवाय कसे विकल्या गेले आणि बीजोत्पादन कोठे झाले; याविषयी सारेच एकमेकांकडे बोट दाखवित आहेत. तंत्रज्ञान पुरवठादार मोन्सॅटोने एच. टी. तंत्रज्ञानाचे बियाणे संशोधन संस्थांच्या प्रक्षेत्रावरून बाहेर गेल्याची साशंकता व्यक्‍त केली होती. परंतु, यातून संशोधक संस्थांना कोणताच फायदा नसल्याने हा दावा खोटा असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात इतक्‍या मोठ्या प्रमाणावर बियाणे कसे पोचले याचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे.

फेब्रुवारीतच आढळले पहिले प्रकरण एच. टी. बियाणे तपासणीसाठी देशात अवघ्या तीन प्रयोगशाळा आहेत. त्यामध्ये नागपुरातील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील एक त्यासोबतच दिल्ली आणि आंध प्रदेशमधील प्रत्येकी एका प्रयोगशाळेचा समावेश आहे. दरम्यान अशाच एका प्रकरणात कृषी विभागाचे प्रतिनिधी केंद्रीय कापूस संशोधन गेले होते. त्या वेळी एच.टी. पॉझिटीव्ह वाणाचा अहवाल त्यांना त्या ठिकाणी मिळाला. फेब्रुवारीतच हे प्रकरण समोर आले होते. परंतु, सीआयसीआरच्या तत्कालीन संचालकांनी शेतकऱ्याने हा नमुना आणल्यामुळे ही बाब गंभीरतेने घेतली नव्हती, असे सांगत आपली जबाबदारी झटकली. या संदर्भाने वेळीच यंत्रणांना सावध केले असते तर यवतमाळ जिल्ह्यात इतक्‍या मोठ्या प्रमाणात एच. टी. बियाण्यांची लागवड झाली नसती, असे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगीतले. तत्कालीन संचालकांशी याविषयी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाही.

त्या वेळी नमुना आला. परंतु, एचटी बियाण्यांमुळे मोठा प्रश्‍न उद्‌भवला नाही, असे त्या वेळच्या तत्कालीन संचालकांना वाटले असावे. त्यामुळे त्यांनी या प्रकाराकडे लक्ष दिले नाही. एचटी बियाणे आणि बोंडअळी याचा काही परस्पराशी संबंध नाही. मूळ मुद्याकडून लक्ष भरकटावे याकरिता हे प्रयत्न केले जात आहे. मुळात कृषी विभागाच्या गुणनियंत्रण शाखेनेच या संदर्भाने नियंत्रण मिळविणे गरजेचे होते. बोंडअळी बीजी-2 तंत्रज्ञानावर आली आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. आता बोंड अळी नियंत्रणासाठी सीआयसीआरने गुजरातच्या धर्तीवर व्यापक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातून येत्या हंगामात बोंड अळी येणार नाही याची दक्षता घेतली जाईल. - डॉ. विजय वाघमारे , संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com