कापूस क्षेत्र १५ लाख हेक्‍टरने रोडावण्याचे संकेत

गुजरात पॅटर्न केंद्राने देशभरातील कापूस उत्पादक राज्यांसाठी द्यायला हवा. त्यावर या महिन्यातच निर्णय व्हावा. - डॉ. ए. ओ. पाटील, कापूस उत्पादक तथा निवृत्त कृषी शास्त्रज्ञ
बोंडअळी
बोंडअळी

जळगाव ः गुलाबी बोंड अळीने यंदा  कापूस उत्पादक व उद्योजकांना अडचणीत आणले आहे. हे संकट पुढील हंगामातही आ वासून उभे ठाकेल, असे कापूस व्यापार, उद्योगतील जाणकारांनी गृहीत धरले आहे. यामुळे देशात येणाऱ्या २०१८-१९ च्या हंगामात कापसाखालील क्षेत्र तब्बल १५ लाख हेक्‍टरने घटण्याचा अंदाज आहे. बोंड अळीवर जोपर्यंत ठोस उपाय सापडत नाही तोपर्यंत कुठलेही सकारात्मक वातावरण नसेल, असेही स्पष्ट मत कापूस क्षेत्रातील संघटना, तज्ज्ञ यांनी व्यक्त केले आहे.  जगात सर्वाधिक कापूस लागवड करणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. भारतानंतर चीन व अमेरिका कापूस लागवडीत आघाडीवर आहेत. भारतासह, चीन, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कापसाबाबत काय स्थिती आहे, हे लक्षात घेऊनच कापूस उद्योगाची धोरणे आखली जातात. यापैकी एखाद्या देशात कापूस उत्पादनाबाबत नकारात्मक स्थिती असली तर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारावर लागलीच त्याचा परिणाम होतो. यंदा तोच परिणाम भारतातील कापसावर आलेल्या बोंड अळीच्या संकटामुळे दिसून आला असून, गुणवत्तेचा मुुद्दा बाजारात ऐरणीवर आहे. ज्या गाठीचा दर्जा २९ मिलिमीटर लांब, चार मायक्रोनियर, फक्त दोन टक्के ट्रॅश (कचरा वगैरे), ८० टक्‍क्‍यांवर शुभ्रता (व्हाईटनेस) असा आहे त्याला बाजारात मागणी आहे. कमी गुणवत्तेच्या रुईला फारसा उठाव नाही, अशी माहिती खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरविंद जैन यांनी दिली.  बाजारात परिणाम झालेला असतानाच शेतकऱ्यांमध्ये बोंड अळीचा धसका आहे. कारण गुणवत्तापूर्ण कापसाची मागणी अधिक आहे. किडक्‍या कापसाला हवे तसे दर नाहीत. यंदा उत्पादन परवडले नाही. कोरडवाहू कापसाचे उत्पादन एकरी दीड क्विंटल तर पूर्वहंगामी (बागायती) कापसाचे उत्पादन महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणात एकरी सहा क्विंटल जेमतेम आले. यामुळे महाराष्ट्रात कापसाखालील क्षेत्र सुमारे सहा ते सात लाख हेक्‍टरने, तेलंगणात सुमारे तीन लाख हेक्‍टर, मध्य प्रदेशात एक ते दीड लाख हेक्‍टर आणि हरियाणा, पंजाब, कर्नाटकातही क्षेत्र घटू शकते, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे. 

बीजी-३ ला मंजुरी द्या बीजी- २ हे तंत्रज्ञान गुलाबी बोंड अळीला बळी पडले आहे. पुढचे तंत्रज्ञान हवे आहे. कापूस उद्योगाने बीजी-३ तंत्रज्ञानाचा मुद्दा २०१४ मध्येच मांडला होता. पण शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. आपल्याकडील कृषी क्षेत्रात संशोधन करणारी मंडळी गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी ठोस तंत्रज्ञान देऊ शकलेले नाही. देशी सुधारित कापूस वाणांबाबतचे बडोदा कृषी विद्यापीठासारखे प्रयत्न देशभर व्हावेत. शासन कापूस बियाण्याचे दर कमी करीत आहे. पण दर कमी करणे हा गुलाबी बोंड अळीवरील उपाय नाही. बीजी २ पुढचे तंत्रज्ञान आणायचे म्हटले तर पाच वर्षे चाचण्या घ्याव्या लागतील. त्याला शासनाने मंजुरी तातडीने द्यावी. पण काही सकारात्मक मोहीम अजूनही महाराष्ट्र व इतर सरकारांनी गुलाबी बोंड अळीबाबत घेतलेली नाही. ही कापूस उत्पादक व उद्योजक यांच्यासाठी धोक्‍याची घंटा आहे, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य अनिल सोमाणी यांनी ॲग्रोवनशी बोलताना सांगितले. मध्य व दक्षिण भारतात परिणाम यंदा पश्‍चिम व उत्तरेकडील म्हणजेच पंजाब, हरियाना, गुजरात, राजस्थानात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव नव्हता. महाराष्ट्रासह तेलंगण, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेशात बोंड अळी अधिक होती. यामुळे आगामी हंगामात मध्य व दक्षिण भारतात कापसाखालील क्षेत्र अधिक घटेल, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे.  देशातील कापूस पिकाची स्थिती  (एक गाठ १७० किलो रुई) २०१७-१८  लागवड ः १२२ लाख हेक्‍टर उत्पादन ः ३६२ ते ३६७ लाख गाठी  २०१८-१९  लागवड ः १०७ लाख हेक्‍टर अपेक्षित उत्पादन ः ३४५ ते ३५० लाख गाठी प्रमुख राज्ये   (क्षेत्र हेक्‍टरमध्ये) ४१ लाख :  महाराष्ट्र   २६ लाख :  गुजरात   १९ लाख :  तेलंगण व सीमांध्र   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com