सप्ताहात कापूस, सोयाबीन, गव्हाच्या भावात सुधारणा

सप्ताहात कापूस, सोयाबीन, गव्हाच्या भावात सुधारणा
सप्ताहात कापूस, सोयाबीन, गव्हाच्या भावात सुधारणा

या सप्ताहात कापूस, सोयाबीन व गहू यांचे भाव चढले. मका, साखर व गवार बी यांचे भाव उतरले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, साखर, सोयाबीन, हळद व गवार बी यांचे भाव वाढतील. अधिक रबी उत्पादनाच्या अपेक्षेने गहू व हरभरा यांचे भाव उतरतील.   या मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर (१४ जानेवारी रोजी) गवार बीच्या १० टनाच्या करारासाठी एनसीडीइएक्समध्ये ऑप्शन व्यवहार सुरू झाले आहेत. सध्या ते फेब्रुवारी २०१८, मार्च २०१८ व एप्रिल २०१८ डिलिव्हरीसाठी उपलब्ध आहेत. सोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता मे फ्युचर्समध्ये विकला तर ३.६ टक्क्यांनी अधिक भाव (रु. ३,४७१) मिळेल. मका (खरीप) व गवार बीचे भाव एप्रिलमध्ये १.७ व ३.५ टक्क्यांनी अधिक (अनुक्रमे रु. १,३२२ व रु. ४,४०९) मिळतील. कापसाचे भाव मार्चमध्ये ५.७ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २१,१००).

गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतींतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका खरीप मक्याच्या (फेब्रुवारी २०१८) किमती डिसेंबर महिन्यात सतत घसरत होत्या. (रु. १,३७० ते रु. १,३३१). या सप्ताहातसुद्धा त्या ०.९ टक्क्यांनी घसरून रु. १,३०८ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १,३०० वर स्थिर आहेत. एप्रिल २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,३२२ वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,४२५ आहे. रबी मक्याची एप्रिल २०१८ च्या डिलिव्हरीची फ्युचर्स किमत रु. १,१६१ आहे. रबी पिकाच्या अपेक्षेने किमती हमीभावाच्या खाली राहण्याचा संभव आहे.

साखर साखरेच्या (फेब्रुवारी २०१८) किमती डिसेंबर महिन्यात रु. ३२७१ च्या आसपास होत्या. या सप्ताहात त्या २.४ टक्क्यांनी घसरून रु. ३,१०० वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१९० वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,१०० वर आल्या आहेत. सध्या साठा पुरेसा आहे. नवीन हंगामाचे उत्पादन आता सुरू झाले आहे. १९ डिसेंबर रोजी केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार या वर्षी भारतातील साखरेचे उत्पादन २४९ लाख टन होईल. (गेल्या वर्षीचे उत्पादन: २५० लाख टन). मात्र गेल्या वर्षीचा साठा लक्षात घेता या वर्षी पुरेसा पुरवठा होईल व साखरेचे भाव स्थिर राहतील. त्यामुळे शासनाची साठ्यावरील व विक्रीवरील बंधने आता काढून टाकण्यात आली आहेत.

सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (फेब्रुवारी २०१८) किमती १४ डिसेंबरपासून सतत वाढत आहेत. (रु. ३,०७७ ते रु. ३,१४९). गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात त्या १.९ टक्क्यांनी वाढून रु. ३,३१४ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती १.६ टक्क्यांनी वाढून रु. ३,३५० वर आल्या आहेत. मे २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,४७१ वर आल्या आहेत. हमीभाव (बोनससहित) रु. ३,०५० आहे. खाद्य तेल-उद्योगाची मागणी वाढत आहे. शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. पुढील वर्षी सोया पेंडीच्या निर्यातीत वाढ होऊन ती २० लाख टनांवर जाईल, असा अंदाज केला गेला आहे (मागील वर्षीची निर्यात : १५ लाख टन). त्यामुळे पुढील काही महिने किमतींत वाढीचा कल राहण्याचा संभव आहे.

हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती डिसेंबरमध्ये वाढत होत्या (रु. ७,३६० ते ७,९५०). या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी वाढून रु. ७,६०६ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,६२५ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,७५८). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे; मात्र देशांतर्गत मागणी वाढती आहे. पुढील काही दिवसांत किमती वाढण्याचा संभव आहे.

गहू ११ डिसेंबरपासून गव्हाच्या (फेब्रुवारी २०१८) किमती वाढत होत्या. (रु. १,६७४ ते रु. १,७३३). या सप्ताहात त्या १.७ टक्क्यांनी वाढून रु. १,७१८ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (दिल्ली) रु. १,८०६ वर आल्या आहेत. एप्रिल २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.९ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १,६९९). पुढील वर्षाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमीभाव (बोनससहित) रु. १,७३५ आहे.

गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१८) किमती १२ डिसेंबरपासून वाढत होत्या (रु. ३,८६४ ते रु. ४,१८५). या सप्ताहात त्या १.१ टक्क्यांनी घसरून रु. ४,३१९ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,३०० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा एप्रिल २०१८ मधील फ्युचर्स किमती ३.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४४९). मागणी वाढती आहे; किमतीतील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे.

हरभरा १४ डिसेंबरनंतर हरभऱ्याच्या फ्युचर्स (मार्च २०१८) किमती वाढत होत्या (रु. ३,७१६ ते ३,८२४). या सप्ताहात त्या रु. ३,८२४ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,०२६ वर आल्या आहेत. उत्पादनवाढीच्या अपेक्षेने मे २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २.७ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ३,९१६). शासनाचा हमीभाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिलनंतर भाव घसरू नयेत, यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे.

कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१८) किमती डिसेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. १९,३७० ते रु. २०,६३०). या सप्ताहात त्या २.७ टक्क्यांनी वाढून रु. २०,९०० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,९५६ वर आल्या आहेत. मे २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ०.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २०,१००). कपाशीचा एप्रिल २०१८ डिलीव्हरी भाव प्रति २० किलोसाठी रु. १०००.५० आहे. प्रथम अंदाजानुसार या वर्षी कापसाचे उत्पादन घसरून ३२.३ दशलक्ष गाठीवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: ३३.१ दशलक्ष गाठी). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे.(सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गाठी).   arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com