तुटवड्यामुळे शिलकी कापूस गाठींचा वापर वाढला

कापूस गाठी
कापूस गाठी

जळगाव ः जगात दुसऱ्या क्रमांकाचा कापूस उत्पादक व मोठा निर्यातदार म्हणून ओळख असलेल्या भारतातील महाराष्ट्रासह काही दाक्षिणात्य राज्यांमध्ये बोंड अळीने कापसावर हल्ला केल्याने त्याचे जगभरातील कापूस व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाले आहेत. अळीग्रस्त पिवळसर रुईची मागणी नसल्याने जगात दर्जेदार रुईची (८० टक्के शुभ्र) गरज भागविण्यासाठी चीन वगळता इतर सर्व राष्ट्रांनी आपल्या मागील कापूस हंगामातील गाठींची (कॅरी फॉरवर्ड) आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री सुरू केली आहे. यातच चीननेही आपली स्थानिक गरज पूर्ण करण्यासाठी संरक्षित साठ्यातून (बफर स्टॉक) गाठींचा (एक गाठ १७० किलो रुई) पुरवठा केल्याची माहिती कापूस बाजारपेठ विश्‍लेषकांनी दिली आहे.  चीन जगातील सर्वांत मोठा कापूस उत्पादक देश आहे. ५०० लाख गाठींचे उत्पादन चीन करतो. परंतु चीनमध्ये कापसाचे क्षेत्र २० टक्‍क्‍यांनी घटले आहे. यातच चीनने २०१४ पासून ४ कोटी गाठींचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करून ठेवला होता. कापसाची आयात न करता संरक्षित साठ्याचा उपयोग स्थानिक गरजेसंबंधी चीनने सुरूच ठेवला आहे. दुसऱ्या बाजूला उत्पादन कमी झाल्याने चीनचा संरक्षित साठा एक कोटी गाठींपर्यंत राहिला असून, पुढील काळात चीनदेखील स्थानिक गरजेसंबंधी आशियाई किंवा आपल्याला सोयीस्कर असलेल्या देशांमधून कापसाची आयात करील. त्यामुळे बाजारातील तेजी टिकून राहील, असे संकेत आंतरराष्ट्रीय बाजारात असल्याची माहिती बाजारपेठेचे अभ्यासक संदीप पाटील (जळगाव) यांनी दिली.  कॅरी फॉरवर्डचे प्रमाण घटले रुईचा किंवा गाठींचा हंगाम ३० सप्टेंबरपर्यंत असतो. १ ऑक्‍टोबर ते ३० सप्टेंबर, असा रुईचा हंगाम असतो. ३० सप्टेंबरनंतर ज्या गाठी जगात शिल्लक राहतात त्यांना कॅरी फॉरवर्ड म्हटले जाते. जगात (चीन वगळता) कॅरी फॉरवर्ड गाठी सुमारे दीड कोटी होत्या.  त्यात भारतातील ३५ लाख गाठींचा समावेश आहे. यातच यंदा भारतात प्रमुख कापूस उत्पादक असलेल्या महाराष्ट्र व काही दाक्षिणात्य राज्यांमध्ये गुलाबी बोंड अळीचा कापसावर प्रादुर्भाव दिवाळीलाच झाला. जगात ८० टक्के शुभ्र असलेल्या रुईचा उठाव असत, परंतु अशी रुई मिळणे किडक्‍या बोंडांमुळे दुरापास्त झाले. अशातच डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुईचे दर वाढले. बाजारातील तेजी कॅश करण्यासाठी मागील हंगामातील शिल्लक रुईचा वापर वाढला. परंतु यामुळे कॅरी फॉरवर्ड गाठींचा जगभरातील कापूस निर्यातदार देशांमध्ये वापर वाढला असून, परिणामी कॅरी फॉरवर्ड गाठींमधील ४० टक्के वापर आजघडीला झाला आहे. दीड कोटी गाठींमधून ८० ते ९० लाख गाठी शिल्लक असतील, असे सांगण्यात आले.  डॉलर कमकुवत, निर्यातीवर परिणाम शक्‍य सध्या रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत होत आहे. ६३.२२ पैसे ते ६३.४९ पैसे असे डॉलरचे मूल्य आहे. यामुळे भारतातील कापूस निर्यातीवर परिणाम शक्‍य आहे. परंतु असे असले तरी स्थानिक सूतगिरण्यांमध्ये सुताची तीन ते साडेतीन टक्के मागणी वाढली आहे. स्थानिक गरज भागविण्यासाठी देशात पावणेतीनशे लाख गाठींची गरज असेल. त्यात पुढे संरक्षित साठाही ४० ते ४२ लाख गाठींचा करावा लागेल. यंदा देशात गाठींचे उत्पादन घटणार असून, ३१५ लाख गाठींचे उत्पादन शक्‍य आहे. गाठींचे दर टिकून राहतील, असे महाराष्ट्र सहकारी सूतगिरणी कार्यकारी संचालक असोसिएशनचे सदस्य राजाराम पाटील (शहादा, जि. नंदुरबार) ‘ॲग्रोवन’शी बोलताना म्हणाले. कापूस दृष्टिक्षेपात

  • दर्जेदार कापसाची गरज भागविण्यासाठी जगभरात शिलकी गाठींचा वापर
  • जगभारात कॅरी फॉरवर्ड गाठींमधील ४० टक्के वापर 
  • चीनचा कापसाचा संरक्षित साठाही २० टक्क्यांवर
  • भारतात बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनाला फटका
  • रुपया मजबूत झाल्याने निर्यातीवर परिणाम
  • देशात स्थानिक गरज भागविण्यासाठी पावणेतेनशे गाठींची आवश्यकता
  • कापूस बाजारात आणखी तेजी येण्याची शक्यता  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com