सरकीने मोडला दराचा उच्चांक

सरकीने मोडला दराचा उच्चांक
सरकीने मोडला दराचा उच्चांक

जळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला असून, मागील सर्व विक्रम मोडीत काढत सरकीचे दर ३१५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. सरकी उत्पादनाला फटका बसल्याने सरकीचा साठा मागील अनेक वर्षांमध्ये या हंगामात कमालीचा घटला आहे. आजघडीला फक्त दीड कोटी क्विंटल सरकीचा साठा जिनिंग प्रेसिंग कारखाने, ऑइल मिलमध्ये आहे. परिणामी सरकीसह ढेपीच्या दरात सतत सुधारणा सुरू आहे.

या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सरकीचे दर तीन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढे होते. मागील आठवडाभरात त्यात आणखी क्विंटलमागे १५० रुपयांची सुधारणा झाली असून, बुधवारी (ता. २९) सरकीचे दर ३१५० रुपये प्रतिक्विंटल, एवढे होते. देशात सरकीच्या उत्पादनात २०१८-१९ च्या हंगामात २० टक्के घट झाली आहे. भारतात सुमारे ११ कोटी क्विंटल सरकी उत्पादनाचा अंदाज होता. परंतु उत्पादन दोन कोटी क्विंटलने घटल्याची माहिती मिळाली. 

सरकी तेलासह पशुखाद्यास उठाव असल्याने सरकीची मागणी कायम आहे. सरकी ढेपीचे दर मागील पंधरवड्यात १७५० रुपये (प्रति ६० किलोस) असे होते. त्यात वाढ होऊन ढेपचे दर १८०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. मागील वर्षी मे महिन्यात सरकीचे दर १८०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. तर ढेपचे दरही १२०० रुपयांपर्यंत होते. सरकीचा साठा मागील वर्षी मे अखेरीस सुमारे साडेतीन कोटी क्विंटल होता. या हंगामात मात्र सरकीचा साठा कमालीचा घटल्याने दरात मागील हंगामाच्या तुलनेत क्विंटलमागे किमान १३०० रुपयांनी वाढ दिसत आहे. 

राज्यातील सुमारे ४५० पैकी १५० ऑइल मिलकडे पुरेशी सरकी प्रक्रियेसाठी उपलब्ध होत आहे. अर्थातच सरकी तेलाचे उत्पादनही सुमारे ३० टक्‍क्‍यांनी घटले आहे. तर राज्यातील सुमारे ८०० पैकी फक्त १५० जिनिंग प्रेसिंग कारखाने सध्या व्यवस्थितपणे सुरू आहेत. त्यांना कापसासह सरकीचा तुटवडा भासत असून, जिनिंग प्रेसिंग कारखान्यांमधील ढेपीच्या उत्पादनात २५ टक्के घट झाल्याची माहिती जाणकारांनी दिली. 

कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य अनिल सोमाणी म्हणाले, ‘‘देशात सरकीचा साठा किमान अडीच ते तीन कोटी क्विंटल हवा होता, परंतु फक्त दीड कोटी क्विंटल सरकीचा साठा आहे. एवढ्या कमी साठ्यावर ऑइल मिल, जिनिंग प्रेसिंग कारखान्यांमध्ये पूर्ण क्षमतेने प्रक्रिया करणेही शक्‍य नाही. शिवाय उत्पादन वाढणार नाही, हे स्पष्ट आहे.’’

देशात सरकीचा साठा मागील हंगामाच्या तुलनेत निम्मेच आहे. यामुळे प्रक्रिया उद्योगांनाही फटका बसत आहे. दुसरीकडे देशात सरकीची आयात करता येत नाही. सरकीच्या आयातीवर बंदी असल्याने सरकीचा साठा वाढविणेही अशक्‍य आहे. नवीन हंगामातून कापूस येण्यास आणखी किमान पाच महिने लागणार आहेत. यामुळे सरकीच्या बाजारातील तेजी टिकून आहे. बाजार पुढेही वधारतील, अशी माहिती मिळाली.  

दुधाळ पशुधन पालकांनाही फटका देशात हरियाना, पंजाब, राज्यात मराठवाडा, खानदेशात अनेक दुधाळ पशुधन पालक पशुधनास ढेपेऐवजी सरकी पशुखाद्य म्हणून देतात. या पशुपालकांना महागडी सरकी घ्यावी लागत आहेत. जळगावच्या बाजारात रोज किमान १५ मेट्रिक टन सरकी ढेपेची मागणी आहे. पण कमी उत्पादनामुळे ढेपीचा एवढा पुरवठा करतानाना जिनिंग प्रेसिंग कारखानदारांना काहीसे अशक्‍य होत असल्याचे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com