पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने मारलं

​शासनाने सन २०१५-१६ च्या हंगामात दुष्काळ पडल्याने ६८०० रुपये मदत जाहीर केली होती. यासाठी तलाठ्यांकडून दुष्काळ निधी याद्या तयार करण्यात अाल्या. तेव्हापासून म्हणजेच सन २०१५-१६ पासून दुष्काळनिधीची मदत तेल्हारा तालुक्यातील अनेक गावांना मिळालेली नाही. वारंवार शासनाकडे निवेदने दिली. यंदा पुन्हा दुष्काळी परिस्थिती बनली. - अरविंद अवताडे, दहिगाव, जि.अकोला
अकोला दुष्काळ
अकोला दुष्काळ

जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र याही जिल्ह्यातील शेतीला पावसाच्या खंडाचा जोरदार फटका बसला. कमी कालावधीचे मूग, उडदाचे फारसे उत्पादन झाले नाही. सोयाबीनही जेमतेमच झाली. अाता उभ्या असलेल्या कपाशीवर शेतकऱ्यांची सर्व मदार होती. परंतु कुठे लाल्या, कुठे पाण्याचा ताण बसल्याने कपाशीचे उभे पीक लालसर, सुकलेले पहायला मिळत अाहे. अशा स्थितीमुळे लागलेल्या बोंड्या तेवढ्या फुटून कापूस यायला सुरुवात झाली. कोरडवाहू लागवड असलेल्या कपाशीचे उत्पादन किती राहील याची खात्री नाही.   अकोला जिल्ह्याचे अर्थकारण कापूस व सोयाबीन या पिकांभोवती अाजही फिरते. दुर्दैवाने या दोन्ही पिकांसाठी बहुतांश शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चाची बरोबरी होण्याची शक्यता दिसत नाही. प्रामुख्याने खारपाणपट्टा व कोरडवाहू पिकांची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली अाहे. अकोला जिल्ह्यातील शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अाधारीत अाहे.

विहिरींनी गाठला तळ जिल्ह्यात पाऊस चांगला झाला असला तरी भूजल पातळीत मोठी अाली अाहे. विहिरींची पातळी चार ते पाच फुटांनी खाली गेली. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठला. सतत पाणी मिळणाऱ्या विहिरीतून अाता टप्प्याटप्प्याने पाणी उपसावे लागते. तर बहुतांश विहिरी तास दीड तास पाणी देतात. याचा परिणाम थेट सिंचनावर होत अाहे. विहिरींवर अाधारीत असलेले सिंचन सर्वत्रच कोलमडलेले अाहे.

पीककर्जापासून ६९ टक्के शेतकरी दूर  जिल्‍ह्याला खरिपात पीककर्ज वाटपासाठी १३३४ कोटींचे उद्दिष्ट होते. सप्टेंबरअखेरपर्यंत यापैकी मोजून ४११ कोटी रुपये बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज म्हणून वाटप केले. ही उद्दिष्टाच्या केवळ ३१ टक्केच काम झाले. यात सर्वाधिक १८४ कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वाटप केले. राष्ट्रीयकृत बँकांनी १७५ कोटी व उर्वरित रक्कम इतर सर्व बँका मिळून वाटप झाली. ३१ टक्के शेतकऱ्यांना कर्ज मिळाले. ६९ टक्के शेतकरी पीक कर्जाविना राहिले. पीककर्ज वाटप न होण्यात बँकांनी तांत्रिक अडचणींचे कारण पुढे केले. सोबतच कर्जमाफीचा न सुटलेला गुंता हासुद्धा मारक ठरलेला अाहे. 

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात अनियमित पावसामुळे पिके संकटात सापडली आहेत. कपाशी अाता सुकायला लागल्याने कोरडवाहू शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हटल्या जाणाऱ्या कापसावर शेतकऱ्यांची सर्व मदार असते. मात्र पावसाने ऐन वेळेवर दगा दिल्याने वरुणराजा कोपल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीही शिल्लक उरण्याची चिन्हे नाहीत. जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन या पिकांची जेमतेम उत्पादकता अालेली अाहे. अाता कापसाचा उताराही अशा बिकट स्थितीमुळे किती येईल हे सांगता येत नाही. लावलेला खर्च निघाला तरी शेतकऱ्यांनी समाधान मानावे अशी परिस्थिती अोढवली अाहे. 

जमिनीला पडल्या भेगा जिल्ह्यात पावसाच्या शेवटच्या म्हणजे सप्टेंबर या महिन्यात अत्यंत कमी पाऊस झाला. सरासरी १५० मिलिमीटर पावसाची अपेक्षा असताना दोन दिवसात केवळ ६० मिलि पाऊस झाला व या वर्षाचा पावसाळा संपला. अाता अडीच महिन्यांपेक्षा अधिक काळापासून पाऊस नसल्याने सर्वत्र जमीन भेगाळली अाहे. परतीचा पाऊस अाला असता तर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा भेटला असता. दुर्दैवाने हा पाऊसच न झाल्याने उशिराने येणाऱ्या कोरडवाहू कपाशी पिकाला सर्वाधिक तोटा झाला. शिवाय रब्बीच्या दृष्टीने अार्द्रताही पुरेशी मिळाली नाही. भेगाळलेल्या जमिनीमुळे तुरीचे पीकही फारसे चांगल नाही. तुरीला खारपाणपट्ट्यात अमरवेलसारख्या नव्या संकटाने घेरले.  

रब्बीवरच अाता भिस्त अकोला जिल्ह्यातील अकोटचा पट्टा वगळता इतर भागातील बहुतांश प्रकल्प यावर्षी तुडुंब भरलेले अाहेत. या प्रकल्पातील पाणी रब्बीसाठी देण्याची घोषणा झालेली असून नियोजन केले जात अाहे. यामुळे रब्बीचे क्षेत्र लागवडीखाली येईल. जिल्ह्यात हरभऱ्याची लागवड होणे अपेक्षित असून खरिपात बसलेली झळ यातून भरून काढण्यासाठी शेतकरी नव्याने कामाला लागले अाहेत.   प्रतिक्रिया सुरुवातीला पाऊस उशिरा आला. त्यामुळे पेरणी लांबली. नंतर अत्यल्प पाऊस झाल्याने कपाशीवर त्याचा मोठा परिणाम पडला. कपाशीचे पीक जवळपास हातचे गेले आहे. अाता वर्षभर कुटुंबाचा खर्च, मुलांचे शिक्षण कसे करावे, असा प्रश्न पडला आहे. - गणेश मांजरे, शेतकरी गांधीग्राम, जि. अकोला. 

हा भाग खारपाणपट्ट्यात येत असल्यामुळे आमची सर्व मदार निसर्गावर आहे. या भागात विहीर होत नाही. बोअर केल्यास त्याला खारे पाणी लागते. त्यामुळे आम्हाला हा एक प्रकारचा शाप मिळाला अाहे. निसर्गही साथ देत नाही अाणि शासनही. -  शिशुपाल मार्के, शेतकरी, गोपालखेड जि. अकोला

चांगले दिसणारे पीक डोळ्यासमोर वाया जाताना बघावे लागले. यावर्षी एकही पुर वाहताना दिसला नाही. पुर्वी रात्रंदिवस चालणाऱ्या विहिरी, कूपनलिका आता उपशावर आल्या आहेत. या भागात संत्र्याचे पिक घेतले जाते. या बागाही पाण्याअभावी संकटात अाल्या अाहेत. शिवाय संत्र्याचे दरही कमी अाहेत.    - संजय ताडे, बोर्डी ता. अकोट जि. अकोला.

मागील गेल्या दोन तीन वर्षापासून पावसाचा लहरीपणा वाढला. समाधानकारक पाऊस होत नसल्यामुळे खरिपासह रब्बी पिके तसेच फळबागांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. अामच्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात अकोटचा मात्र समावेश न केल्याने अाश्चर्य वाटत अाहे. - विशाल भालतिलक, बोर्डी जि. अकोला.

सांगळूद शिवारात दोन एकरात जून महिन्यात कपाशीची लागवड केली होती. सुरुवातीला पीकही चांगले दिसत होते. जसजसा काळ लोटला तशी पिकाची अवस्था बिकट झाली. अाता झाडावर जितक्या बोंडया लागलेल्या अाहेत, त्यातून कापूस यायला लागला. अातापर्यंत दोन एकरात दीड क्विंटल कापूस अाला. २५ हजार रुपये खर्च लागलेला आहे. - रामदास राणे, सांगळूद, ता.जि. अकोला

हंगामात दोन एकरात उडीद पेरला होता. त्यात मोजून दोन कट्टे उडीद झाला. अाता शेतात तुरीचे पीक उभे अाहे. परंतु या तुरीला अमरवेलने गुंडाळल्याने काही पीक कापून टाकावे लागले अाहे. - गजानन मदनकार, सांगळूद जि.अकोला

दोन एकरात कापूस लालवेल असून उत्पादन खर्चही निघण्याची शक्यता दिसत नाही. अातापर्यंत केवळ एक क्विंटल ७५ किलो कापूस अाला. पीक लाल पडत असून किती दिवस ते टिकेल याची शक्यता दिसत नाही. - पंढरी तुळशीराम काळे, सांगळूद, जि. अकोला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com