खारपाणपट्ट्यात पावसाच्या खंडाने खरीप संकटात

अामच्या भागात २६ जून ते ७ जुलै या काळात पेरण्या झाल्या. दरम्यानच्या काळात पावसाने मोठा खंड दिल्याने पिकांची वाढ झालेली नाही. दुपारच्या सुमारास शेतांमध्ये भकास वातावरण असते. खेड्यांमध्ये यामुळे आता उत्साहसुद्धा शिल्लक उरलेला नाही. अाता पाऊस अाला तरी झालेले नुकसान भरून निघण्याची शक्यता नाही. - सुखदेवराव अढाऊ, शेतकरी, गांधीग्राम, जि. अकोला.
अकोला : गांधीग्राम शिवारात सुधाकर ढोरे यांनी लागवड केलेल्या कपाशीची पावसाअभावी वाढ खुंटली अाहे.
अकोला : गांधीग्राम शिवारात सुधाकर ढोरे यांनी लागवड केलेल्या कपाशीची पावसाअभावी वाढ खुंटली अाहे.

पावसात कुठे १७ दिवस तर कुठे २२ दिवसांचा खंड पडल्याने पिके केवळ जमिनीत असलेल्या अार्द्रतेवर टिकाव धरून अाहेत. खारपाणपट्टा असल्याने योग्यवेळी पुरेशे पाणी मिळाले नाही, तर पीक उभे दिसूनही उत्पादन येत नाही, हा वर्षानुवर्षांचा शेतकऱ्यांचा अनुभव अाहे. याहीवर्षी अशीच परिस्थिती अाहे. अाता पाऊस अाला तरी मूग, उडीद, सोयाबीनच्या पिकांची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटलेली दिसून येईल, असे शेतकरी सांगत अाहेत. खारपाण पट्ट्यातील गावांमध्ये सध्या एकच चिंतेचा सूर उमटत अाहे. 

पश्चिम वऱ्हाडात अकोला, बुलडाणा जिल्ह्यात खारपाण पट्टा विस्तारलेला अाहे. पूर्णा नदी खोऱ्यात नदीच्या दोन्ही तिरांवर सुमारे १५ किलोमीटर अंतरापर्यंत दोन्ही बाजूंनी खारपाण पट्टा अाहे. अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम परिसरात यंदाच्या मोसमात अाजवर समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे मूग, सोयाबीन, उडीद व ज्वारीचे पीक हातचे गेल्यासारखेच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मागील वर्षी या परिसरात दुष्काळग्रस्त स्थिती होती. शेतकऱ्यांना जेमतेम पीक झाले होते. यंदा चांगला पाऊस होईल असे सांगण्यात येत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उसनवारी करून खत बियाणे विकत आणले व पेरणी केली. 

पेरणी होऊन एक ते सव्वा महिना उलटून गेला; मात्र समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे या भागातील पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. गांधीग्राम परिसरातील गोपालखेड, निराट, वैराट, राजापूर, धामना, गोत्रा, पाळोदी, हातरूण, निंभोरा, वल्लभनगर, हिंगणा, सांगवी बाजार यापैकी कुठल्याही गावात भेट दिली तरी शेतकरी चिंताग्रस्त अाहेत हे स्पष्टपणे दिसून येते. पूर्णा नदीच्या उत्तरेकडील चोहोट्टाबाजार, केळीवेळी याही परिसरात पिकांची अशीच स्थिती उदभवलेली अाहे. 

गांधीग्राम येथील विनायकराव काठोडे यांनी ८ एकरांत मुगाची ६ जुलैला लागवड केली. सध्या या पिकाला सव्वा महिना पूर्ण झाला. अाता शेतात पीक उभे दिसत असले तरी पुरेसा फुलोर नाही. परिणामी शेंगा किती लागतील, असा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. अातापर्यंत एकरी पाच हजारांचा खर्च झालेला आहे.

 सुधाकर ढोरे यांनी सहा एकरात कपाशीची १० जुलैला लागवड केलेली अाहे. पुरेसा पाऊस न झाल्याने त्यांच्या कपाशीची वाढच झालेली नाही. कुठे अर्धा फूट, कुठे एक फुटाचे झाड दिसते. एकरी हजारोंचा खर्च झालेला अाहे. अाता पाऊस अाता तर पीक थोडेफार येईलही परंतु सर्वत्र अालेले बोंड अळीचे संकट याही पिकावर अाले तर काय करायचे, असा त्यांचा प्रश्न चिंतातूर बनवतो.   

 पावसाचा खंड वाढताच या भागात २४ जुलैनंतर पाऊस गायब झालेला अाहे. जुलैचा शेवटचा संपूर्ण अाठवडा व अाता अाॅगस्टमधील १३ दिवस विना पावसाचे लोटले अाहेत. मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण अाहे. परंतु तुरळक ठिकाण वगळता पाऊसच झालेला नाही. उजाडणारा प्रत्येक दिवस कोरडा जात असल्याने अाता खारपाण पट्ट्यातीलच नव्हे, तर इतर भागातील सुद्धा पिकांची स्थिती कमकुवत होत चालली अाहे. सोयाबीनचे पीक कुठे फुलोर, कुठे शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत अाहे. मूग, उडदासाठी हा कालावधी फुलोरा तसेच शेंगा धरण्याचा अाहे. जूनमधील लागवड झालेल्या क्षेत्रातील मुगाचे पीक तर काढणीलासुद्धा अाले असते, परंतु पावसाअभावी हा कालावधी लोटल्या गेला. कपाशीच्या पिकालाही पावसाची नितांत गरज अाहे.     

वन्यप्राण्यांचा त्रास पाऊस नसल्याने अाधीच पिकांची वाईट स्थिती अाहे. त्यातही जी पिके तग धरून अाहेत, अशा पिकांना हरीण, रानडुक्कर, माकड, रोही या प्राण्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत अाहे. या प्राण्यांचे थवे पिकांचे अतोनात नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांना दिवसरात्र पिकांची राखण करण्यात वेळ घालावा लागत अाहे.

प्रतिक्रिया या वर्षी मी माझ्या शेतामध्ये १४ एकरांत मुगाची ५ जुलैला पेरणी केली होती. मात्र, पेरणीनंतर तुरळक वगळता फारसा पाऊस नसल्याने मुगाचे पीक जवळपास हातून गेले आहे.  - गोपाळराव परनाटे, शेतकरी, निराट, जि. अकोला

मी ७ जुलै रोजी कपाशीची पेरणी केली आहे. जवळपास अाता एक ते सव्वा महिना झाला. तेव्हापासून पाऊस नसल्याने कपाशी केवळ तग धरून अाहे. पीक किती होईल, याची काहीच शाश्वती दिसत नाही. कपाशीची झाडे सुकण्याच्या मार्गावर आहे. - सुरेशराव अढाऊ, शेतकरी, गांधीग्राम, जि. अकोला 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com