रब्बी हंगामासाठी पीकविमा योजना लागू
रब्बी हंगामासाठी पीकविमा योजना लागू

रब्बी हंगामासाठी पीकविमा योजना लागू

१ जानेवारीपर्यंत अर्ज मुदत; ज्वारीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंतच पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेत रबी हंगामातील पिकांचा विमा उतरविण्याची सुविधा राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे. विमा अर्ज भरण्याची प्रक्रिया १ जानेवारीपर्यंत चालू राहील, अशी माहिती कृषी विभागातून देण्यात आली. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत कर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतील सहभाग सक्तीचा आहे. तसेच, इतर कालावधीतील कर्जदार आणि बिगरकर्जदारांसाठी एक जानेवारीपर्यंत विम्याचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीसाठी विमा अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंतच देता येणार आहे. राज्यातील उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग पिकाचा विमा उतरविण्याची सुविधा ३१ मार्चपर्यंत चालू राहणार आहे. राज्यात यंदा रबी हंगामासाठी विम्याचे काम दोन कंपन्यांना मिळाले आहे. त्यात ओरिएन्टल इन्शुरन्स आणि नॅशनल इन्शुरन्स या दोन कंपन्यांचा समावेश होतो.

अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, सातारा, अमरावती, जळगाव या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडे जाणार आहेत. या कंपनीचा टोल फ्री क्रमांक १८००११८४८५ असा आहे. इतर सर्व जिल्ह्यांतील विम्याचे प्रस्ताव नॅशनल इन्शुरन्स कंपनी (टोल फ्री क्रमांक १८००२००७७१०) हाताळणार आहे.

राज्यात यंदा रबी हंगामात हरभऱ्याच्या क्षेत्रात मोठी वाढ होते आहे. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचा विमा योजनेतील सहभागदेखील वाढण्याची शक्यता आहे. शासनाने २०१७-१८ च्या रबी हंगाम पीकविमा योजनेत हरभरऱ्यासाठी हेक्टरी विमा संरक्षित रक्कम २४ हजार रुपये इतकी निश्चित केली आहे.

इतर पिकांची हेक्टरी विमा संरक्षित रक्कम रुपयांमध्ये अशीः बागायती गहू- ३३ हजार, जिरायती गहू- ३० हजार, बागायती ज्वारी- २६ हजार, जिरायती ज्वारी- २४ हजार, करडई- २२ हजार, सूर्यफूल- २२ हजार, उन्हाळी भात-५१ हजार, उन्हाळी भुईमूग-३६ हजार, रबी कांदा-६० हजार रुपये. शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता राज्यातील सार्वजनिक सेवा केंद्रांमध्ये (सीएससी) विमा अर्ज भरण्याची सुविधा चालू करण्यात आली आहे. याशिवाय शेतकऱ्याला आपले कर्जखाते असलेल्या बॅंकेतदेखील अर्ज भरता येईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. गेल्या रबी हंगामात राज्यातील साडेआठ लाख शेतकऱ्यांनी विमाहप्ता भरला होता. यंदा मात्र शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com