अकोला जिल्ह्यात पीक कर्जवाटपाचे लक्ष्य अद्यापही दूरच

२०१५ पर्यंत ज्यांची कर्जमाफी झाली त्यांचे अर्ज बँकांनी घेतले. मात्र, अद्याप अनेकांना पीककर्ज मिळालेले नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरले. काहींनी हात उसनवारी केली. कुणी नातेवाईक, मित्रांकडून पैसे घेतले. ज्यांची काहीच सोय झाली नाही, अशांच्या जमिनी पेरणीविना पडून अाहेत. पैशांअभावी ग्रामीण भागातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली अाहे. - मनोज तायडे, शेतकरी, कौलखेड जहाँगीर, जि. अकोला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला : खरिपातील पेरणी अंतिम टप्प्यात पोचली असली तरी बँकांना पीक कर्जवाटपात २५ टक्क्यांपर्यंतसुद्धा अद्याप पोहोचता अालेले नसल्याची बाब समोर अाली अाहे. जिल्ह्यात पीक कर्जवाटपासाठी वेळोवेळी बैठका, बँकांविरुद्ध कारवाया करण्यात आल्या तरी पीक कर्जवाटपाची गती संथच अाहे. पीककर्जाअभावी पेरण्यांसाठी शेतकऱ्यांनी उधारी, हातउसनवारीचे व्यवहार केले. तर काहींनी दागिने गहाण ठेवूनही पैसे काढल्याचे स्पष्ट झाले.

अकोला जिल्ह्यात खरिपासाठी १३३४ कोटींचे पीक कर्जवाटप उद्दीष्ट बँकांना देण्यात अालेले अाहे. यात जिल्हा बँकेला ६८३ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांना ५२७ कोटी, खासगी बँकांना ४७ कोटी अाणि ग्रामीण बँकेला ७ कोटींचे उद्दीष्ट अाहे. यामध्ये सर्व बँकां मिळून अातापर्यंत २६९ कोटी ११ लाख रुपये पीक कर्जवाटप झाले. एकूण लक्ष्याच्या केवळ २१ टक्के हे वाटप झालेले अाहे.

अाजवर जिल्हा बँकेने १४१ कोटी ७० लाख, राष्ट्रीयीकृत बँकांनी ९६ कोटी, खासगी बँकांनी १५ कोटी तर ग्रामीण बँकांनी १५ कोटी ७८ लाख रुपये असे एकूण २६९ कोटींचे पीककर्ज वितरित केले आहे. जिल्ह्यात अद्याप १०६५ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे लक्ष्य  गाठायचे अाहे.

दीड लाखांपर्यंत    कर्जमाफी झालेले सुमारे एक लाख ४० हजारांवर शेतकरी पीककर्ज मिळण्यास पात्र अाहेत. असे असताना अाजवर केवळ ३२ हजार १५६ शेतकऱ्यांना पीककर्ज मिळू शकले. लाखांवर शेतकरी पीककर्जाच्या प्रतीक्षेत अाहेत. या शेतकऱ्यांना पेरणीच्या काळात पीककर्ज मिळणे अत्यंत गरजेचे होते. परंतु, बँक पातळीवर होत असलेली दिरंगाई शेतकऱ्यांना मारक ठरली अाहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com