मराठवाड्यात पीककर्ज वितरण कासवगतीने

पीककर्ज वितरण कासवगतीने
पीककर्ज वितरण कासवगतीने

औरंगाबाद : आढावा बैठकींचा सपाटा, काही ठिकाणी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना खरिपासाठी कर्जवाटप केले जात असून त्याच्या गतीत समाधानकारक सुधारणा झाल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांतील कर्जवाटपाचा टक्‍का पाहता एकीकडे शेतकऱ्यांची वर्षभरापासून सुरू असलेली कर्जमाफी आणि दुसरीकडे बॅंकांची कर्जवाटपाची कासवगती यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.

चार जिल्ह्यांत जूनच्या पहिल्या दोन आठवड्याअखेर केवळ ८.१७ टक्‍के म्हणजेच ३९४ कोटी ९५ लाख १६ हजार रुपयांचेच प्रत्यक्ष कर्जवाटप करण्यात आले आहे. शासनाला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे आहे. त्यासाठी वेगवेगळ्या घोषणा तसेच थेट पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यापर्यंतचे उपक्रम हाती घेतले जात आहेत. उत्पन्न दुप्पट करावयाचे असल्यास शेतीची सारी कामे वेळेत होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी शेतकरीही आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे क्रमप्राप्त आहे. परंतु, सातत्याने नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमी पडत असल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे शासनाने जवळपास वर्षभरापूर्वी कर्जमाफीची घोषणा केली. लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असून उर्वरित शेतकऱ्यांना त्याचा लाभ देणे सुरूच असल्याचे शासनाकडून सांगण्यात येते. परंतु, शासानाचा कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी व नव्याने कर्जवाटप झालेल्या शेतकऱ्यांच्या संख्येचा मेळ मात्र बसत नसल्याचे चित्र आहे. यामागचे कारणही स्पष्ट होत कर्जमाफीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पुन्हा नव्याने कर्ज मिळविण्यासाठी विविध बॅंक शाखांच्या चकरा सुरू आहेत.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांतील जिल्हा सहकारी, व्यापारी व ग्रामीण बॅंकांना येत्या खरिपासाठी ४ हजार ८३२ कोटी ५३ लाख  ६० हजार रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी जूनच्या पहिल्या दोन आठवड्याअखेर केवळ ८.१७ टक्‍के म्हणजेच ३९४ कोटी ९५ लाख १६ हजार रुपयांचेच प्रत्यक्ष कर्जवाटप करण्यात आले आहे. चारही जिल्ह्यांतील ७२ हजार ५७ शेतकरी सभासदांनाच प्रत्यक्ष कर्ज मिळाले आहे.

गतवर्षी हेच कर्जवाटप ६३९ कोटी १० लाख ४० हजार इतके झाले होते. उद्दिष्टाच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात १२. ०७, जालना जिल्ह्यात  १०.६८, परभणी जिल्ह्यात ५.६३ तर हिंगोली जिल्ह्यात केवळ ४.१२ टक्‍केच कर्जवाटप झाले आहे. चारही जिल्ह्यांतील बॅंकनिहाय कर्जवाटपाचे अवलोकन करता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी ११.४५, व्यापारी बॅंकांनी ४.६८ तर ग्रामीण बॅंकेने २२.८५ टक्‍के उद्दिष्टपूर्ती केली आहे.

जिल्हानिहाय कर्ज मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या

औरंगाबाद    २४,४५१
जालना  २८,१९९
परभणी  १२,५२५
हिंगोली  ६८८२

जिल्हा    उद्दिष्ट    पूर्ती

औरंगाबाद  ११५९ कोटी ४८ लाख ७० हजार  १३९ कोटी ९१ लाख ९२ हजार
जालना  १२४३ कोटी ६० लाख ७८ हजार    १३२ कोटी ७८ लाख १२ हजार
परभणी  १४७० कोटी ४४ लाख १२ हजार ८२ कोटी ७४ लाख ४० हजार
हिंगोली     ९५९ कोटी  ३९ कोटी ५० लाख ७२ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com