नगर जिल्ह्यात २४ टक्के पीककर्ज वाटप

जिल्हाभरातील राष्ट्रीयीकृत, खासगी आणि जिल्हा बॅंकेकडून कर्ज वितरणात दिरंगाई होऊ नये याबाबत लेखी सूचना दिल्या आहेत. कर्जवाटपाची प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत असते. तरीही खरिपात कोणत्याही शेतकऱ्यांची अडचण होऊ नये याबाबत काळजी घेतली जात आहे. - तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, नगर
पीककर्ज वाटप
पीककर्ज वाटप

नगर : खरिपात शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आघाडीवर आहे. राष्ट्रीयीकृत बॅंका मात्र शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत उद्दिष्टाच्या सरासरी २४.११ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने दिलेल्या कर्जाची टक्केवारी ३२.७, राष्ट्रीयीकृत बॅंकाच्या कर्जवाटपाची टक्केवारी १९.३६ आहे. खासगी बॅंकांची टक्केवारी मात्र अवघी सात आहे. आतापर्यंत ५ लाख १३ हजार ६४ शेतकऱ्यांपैकी अवघ्या १ लाख ३८ हजार ६१५ शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले आहे.

जिल्ह्यात दरवर्षी खरिपात पीककर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग असते. यंदाही तशीच स्थिती आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बॅंका पीककर्ज देत नाहीत, मागणी केल्यानंतर शेतकऱ्यांना चकरा मारायला लावणे असे प्रकार सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वाधिक २९६ शाखा आहेत. त्याशिवाय राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या ३१९, खासगी बॅंकेच्या ७५ आणि महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या ९ अशा ६९९ शाखा आहेत.

शासनाने यंदा २१ राष्ट्रीयीकृत बॅंकेमार्फत २ लाख ४८ हजार १८४ शेतकऱ्यांना २२३३ कोटी १५ लाख, बारा खासगी बॅंकाना ३३ हजार ९९३ शेतकऱ्यांसाठी ३०५ कोटी ९४ लाख, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला २ लाख २५ हजार ४१३ शेतकऱ्यांसाठी २ हजार २८ कोटी ८६ लाख, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला ५५१० शेतकऱ्यांसाठी ४९ कोटी ५८ लाख असा ५ लाख १३ हजार ०६४ शेतकऱ्यांना पीककर्ज वितरणासाठी ४ हजार ६१७ कोटी ५३ लाखांचा पतपुरवठा जाहीर केला होता.

मात्र आतापर्यंतची स्थिती पाहता खरिपात शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत बॅंकांनी फारसे गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्यातही राष्ट्रीयीकृत बॅंका पूर्णतः उदासीन आहेत. अन्य बॅंकाच्या तुलनेत बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल बॅंकेची पीककर्ज वितरणाची स्थिती बरी आहे. मात्र अन्य चार बॅंकांनी एकही रुपया कर्जवाटप केले नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक कर्ज वितरणात आघाडीवर आहे.

अग्रणी बॅंकेकडून मिळालेल्या माहितीनुसार १ लाख २० हजार ४१७ शेतकऱ्यांना बॅंकेकडून ६५० कोटी ७२ लाख रुपयांचे पीककर्ज वितरण झाले आहे. त्याची टक्केवारी ३२.०७ आहे. त्यात कर्जमाफी मिळालेल्या ८० हजार १४५ शेतकऱ्यांना ४३८ कोटी २५ लाखांचे वितरण केले गेले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com