वऱ्हाडात खरिपात केवळ ३० टक्क्यांपर्यंत पीककर्ज वितरण

मी स्टेट बँकेच्या जानेफळ शाखेत माझी पीककर्जाची फाइल दिली अाहे. मला बँकेने २८ सप्टेंबरला बोलावले अाहे. खरीप हंगामाला सुरवात होऊन चार महिने लोटत अाहेत. तरीही पीककर्ज मिळालेले नाही. माझ्यासारखे असंख्य शेतकरी अाहेत. - अनिल रामकृष्ण सुरडकर, नायगाव देशमुख, ता. मेहकर, जि. बुलडाणा.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  ः शासनाने शेतकऱ्यांना अार्थिक पाठबळ देण्यासाठी या हंगामात पीक कर्जवाटपाच्या उद्दिष्टात मोठी वाढ केली; परंतु ही वाढ केवळ अाकड्यांपुरतीच शिल्लक राहिली असून, यंदाच्या खरीप हंगामात केवळ सरासरी ३० टक्क्यांपर्यंत पीककर्ज वितरित झाले आहे. पुढील महिन्यापासून रब्बी हंगाम सुरू होत असून, त्यासाठी पीक कर्जवाटप करण्याचे नियोजन अाहे.  

यंदा खरिपासाठी बुलडाणा जिल्ह्यात १७४५ कोटींचे पीककर्ज वितरणाचे नियोजन करण्यात अाले होते. त्यापैकी अातापर्यंत सर्व बँकांना मिळून ५०० कोटींचा टप्पाही गाठता अालेला नाही. अकोला जिल्ह्यात १३३४ कोटींचे पीक कर्जवाटपाचे नियोजन असताना येथेसुद्धा अाॅगस्टअखेर ४०० कोटींचेही वाटप होऊ शकलेले नाही. या दोन्ही जिल्ह्यांत अातापर्यंत ३० टक्क्यांपर्यंतही पीककर्ज वितरण झालेले नाही. पीककर्ज गतीने द्यावे, असे वारंवार सांगण्यात अाले. मात्र बँकानी शेवटपर्यंत कागदपत्रे व तांत्रिक अडचणी समोर करीत अादेशांना जुमानले नाही, हे स्पष्ट झाले.

सप्टेंबर महिना अर्धा संपायला अाला. या महिनाअखेर खरीप पीक कर्जवाटपाचा कालावधी संपेल. त्यानंतर रब्बीची तयारी सुरू होईल. सध्या एकाही बँकेकडून पीक कर्जवाटपाला गती मिळताना दिसत नाही. प्रामुख्याने पीक कर्जवाटपात कर्जमाफीची अद्यापही पूर्ण न झालेली प्रक्रिया बहुतांश प्रमाणात कारणीभूत ठरली अाहे. अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ होऊनही अद्याप प्रक्रिया झाली नाही. या खरिपात शेतकऱ्यांनी तडजोडी करून पेरणी केली. मुगाचा हंगाम सुरू झाला अाहे. लवकरच उडीद, सोयाबीनचाही हंगाम सुरू होईल. त्यानंतर रब्बीची लागवड केली जाईल. खरिपासाठीच पीककर्ज मिळालेले नसल्याने रब्बीतसुद्धा बँका किती सहकार्य करतात हा संशोधनाचा विषय अाहे.

२०१६-१७ अाणि २०१७-१८ मध्ये पीककर्ज काढलेल्या हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. शासनाने २०१६-१७ मधील थकीत कर्जदारांची माहिती जिल्हा प्रशासनाकडे मागितल्याचे वृत्त अाहे. माहिती मागितल्याने या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल काय, अशा चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झालेल्या अाहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com