उन्हाळी 'कॅश क्रॉप'कडून अपेक्षा

उन्हाळी 'कॅश क्रॉप'कडून अपेक्षा
उन्हाळी 'कॅश क्रॉप'कडून अपेक्षा

मा गच्या वर्षातील दुसऱ्या सहामाहीत (जून ते डिसेंबर २०१७) कांदा, टोमॅटो, कोबी या तिन्ही पिकांना जोरदार बाजारभाव मिळाला. चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत या तिन्ही पिकांना मंदीचा मार बसला आहे. आता पावसाळी हंगामासाठी- म्हणजे वर्षातील दुसऱ्या सहामाहीत पीक येईल - यासाठी राज्यभरातील शेतकरी नियोजन करीत आहेत. चालू सहामाहीतील मंदीमुळे पुढच्या सहामाहीत तेजी राहिल, असे सरसकट अनुमान काढणे बरोबर ठरणार नाही. कारण मे-जून-जुलै मध्ये उन्हाची तीव्रता, पाऊसमान, रोगराई कशी राहते, यावर बाजाराचे गणित अवलंबून असेल. जर पाऊसमान अनुकूल राहिले, तर फार मोठ्या अपेक्षा ठेवता येणार नाही. प्रतिकूल वातावरणात चांगली उत्पादकता काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वर्षागणिक वाढते आहे. वरील तिन्ही पिकांचे नियोजन करताना, त्यातील काही क्षेत्र पडीक ठेवता आले, तर पुरवठा काही प्रमाणात संतुलित राहील. त्याचा सर्वांना फायदा होतो. सध्या कोबीची फार्मगेट किंमत एक रुपये प्रतिकिलोच्याही खाली गेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पिकावर ट्रॅक्टर फिरवले आहेत. जानेवारी-फेब्रुवारीचे प्लॉट अनुकूल वातावरणामुळे यशस्वी झाले, पण बाजारभावाच्या दृष्टिने तोट्यात गेले. आता, मे-जूनमध्ये रोपे टाकलेले प्लॉट प्रतिकूल वातावरणामुळे यशस्वी होतात, हे गृहीतक प्रमाण मानून लागवड वाढण्याचे संकेत मिळत आहेत. तिचे भवितव्य सर्वस्वी हवामानावर अवलंबून आहे. "गेल्या वर्षी जूननंतर सहा-सात महिने कोबीत उच्चांकी तेजी होती. महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील कोबी टप्प्याटप्प्याने देशांतर्गत बाजारात येतो. दिवाळीनंतर हापूसचा माल सुरू होतो. गेल्या वर्षी तेथे उत्पादन कमी होते. त्यामुळे तेजी लांबली होती. मे-जूनमध्ये पीक जगत नाही, उत्पादन घटते, हे खरे पण असे प्रत्येक वर्षी घडेलच असे नाही. यापूर्वी कोबीत वर्ष वर्ष मंदी अनुभवली आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात उच्चांकी तेजी होती म्हणून या वर्षी मे-जूनमध्ये लागवड वाढण्याचा ट्रेंड सर्रास दिसतो, त्यामुळे व्यक्तिशः पिकाकडून फारशा अपेक्षा नाहीत," असे निरीक्षण शेतकरी आनंद ओस्तवाल यांनी नोंदवले आहे. अनुभवी शेतकरी दीपक बोरसे म्हणाले, "पावसाळ्यात कोबीचे पीक काढणे ही तारेवरची कसरत आहे. त्यामुळे दरवर्षी जुलैनंतर सात-आठ रु. दर मिळतो. उन्हाळ्यात रोपे जगण्यापासून, रोगराई, मजुरांची उपलब्धता आणि पाणीटंचाई आदी अडथळ्याच्या शर्यतीमधून कोबी पीक काढणे ही सोपी गोष्ट नाही. एका फवारणीसाठी सहा लोक लागतात, तर काढणी करायला २० टनाच्या गाडीसाठी ३० मजूर गोळा करावे लागतात. सूर्य आग ओकत असताना ज्याला हे सगळे जमते त्याला पैसा मिळतोच. त्यामुळे आम्ही उन्हाळी पिकाबाबत नेहमीच आशावादी असतो." वरील दोन्ही शेतकरी गिरणा खोऱ्यातील असून, त्यांच्या प्रतिक्रिया प्रातिनिधिक आहेत.  टोमॅटो बाजारभावातील तेजी-मंदी ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. रोपेनिर्मितीपासून लागणी ते पहिला तोडा बाजारात येईपर्यंत साडेतीन महिन्यांचा कालावधी लागतो. रोपे तयार व्हायला महिना लागतो आणि लागण केल्यानंतर ७५ दिवसांनी साधारणपणे पहिला तोडा येतो. म्हणजे, आज ज्या प्लॉटमधून तोडा सुरू झाला, त्याच्या लागवडीमागील निर्णयप्रक्रियेवर तीन महिन्यापूर्वीच्या बाजारभावाचा प्रभाव होता. जुलै ते डिसेंबर २०१७ या कालावधीत टोमॅटोचा सरासरी बाजारभाव किफायती होता. काहींना उच्चांकी बाजार मिळाला. जानेवारी २०१८ पासून मंदी सुरू झाली. फेब्रुवारी २०१८ ते आजअखेर टोमॅटोचा अक्षरश: लाल चिखल झालाय. एप्रिल-मेपर्यंत मंदी हटण्याची चिन्हे नाहीत, असे तज्ज्ञांचे मत आहे.  महत्त्वाचा मुद्दा असा की, ९० दिवसांच्या मंदीनंतर जुन्या प्लॉटधारकांना फार काळ तग धरणे अवघड आहे. एप्रिल- मे जर खराब गेले तर जुलैपासून ज्यांचा तोडा सुरू होईल, त्यांच्यासाठी तेजीची अपेक्षा करता येईल. या मागे साधा ठोकताळा असा की टोमॅटोचे मार्केट सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ मंदी सोसू शकत नाही, तर वैयक्तिक शेतकऱ्याला एक महिन्यापेक्षा अधिक काळ तग धरणे शक्य नाही. कांद्याच्या बाबतीत मार्च ते मे या ९० दिवसांतील कांद्याचा सरासरी विक्री दर जवळपास मंदीतच जाण्याची चिन्हे आहेत. व्यावसायिक कांदा उत्पादक कधीही एप्रिल-मे या हार्वेस्टिंग महिन्यांत कांदा विकत नाही. व्यावसायिक विक्री १५ जूननंतरच बाजारभावाचा रागरंग पाहून टप्प्याटप्प्याने सुरू होते. जून ते सप्टेंबर या १२० दिवसांतील कांद्याचा सरासरी विक्री दर एक हजार ते बाराशे रुपयांदरम्यान अपेक्षित आहे. लागवडीखालील क्षेत्र वाढले असले तरी प्रतिएकरी उत्पादकतेत घट आणि निर्यातीचा आधार या दोन्ही गोष्टींमुळे वरील चार महिन्यांचा बाजार खूप फायद्याचा राहणार नसला तरी तोटाही होणार नाही, असा बाजाराचा सूर आहे. (लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com