agriculture news in Marathi, crops affected by drought, Maharashtra | Agrowon

नुकसान डोळ्यांपुढं आलं की दिवस जातच नाही...
संतोष मुंढे
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

कुटुंबात आठ एकर शेती, त्यात चार एकर कपाशी, दीड एकर बाजरी, दीड एकर तूर. कपाशी पावसाअभावी वाळून गेल्यानं मोडून रब्बीसाठी रान तयार केलं पण पाऊसच आला नाय, रान तसच पडलं. बाजरीत दाणे भरलेच नाही, चार दोन पायल्या होईल. तूर वाळून चाललिया.
- अर्जुन पवार, खालापुरी, ता. शिरूर कासार, जि. बीड

‘यंदा पावसानं असं केलं की पीक काढणीला आलं, पण ते काढायच्या लायकीचं राहील नाही. दोन अडीच महिन्यांपासून पाऊस नाही. कापूस एकरी सव्वा किंटल पिकतोया. ऊस तर आज पेटवून देण्याच्या स्थितीत हाय. कुणी त्याला तोडायला पण घेणार नाही, जनावरांच्या खायच्या लायकीचा नाही. सव्वा ते दीड एकरात यंदा पपईची लागवड केली, पण माल लगडला अन पाणी संपलं. पंधरवडा झाला शेतात आलोच नाही. येऊ वाटंना अन त्याच्याकडे पाहू वाटंना. कोणाला काय बोलावं हे पण समजंना. उपसलं कष्ट अन आता झालेलं नुकसान डोळ्यांपुढं आलं की दिवस जातच नाही, करमतच नाही,’ असे शेतकरी रमेश लोंढे यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कोळगावचे शेतकरी रमेश लोंढे यांनी पावसाअभावी त्यांच्या शेतीपिकावर ओढवलेलं संकट, त्यामधून निर्माण झालेले प्रश्न, अस्वस्थ करणारी परिस्थिती बीड जिल्ह्यातील यंदाच्या दुष्काळी परिस्थितीची प्रचिती देते आहे. बीड जिल्ह्याचे खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ६४ हजार हेक्टर. यंदा जवळपास ७ लाख १५ हजार हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली. त्यामध्ये सर्वाधिक ३ लाख २७ हजार हेक्टरवर कपाशी, तर त्यापाठोपाठ २ लाख ३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती.

झळा दुष्काळाच्या : अॅग्रोवनची 'अॉन द स्पॉट' मालिका : जिल्हा बीड (video)

वाळून गेली भेंडी
गेवराई तालुक्यातील सावरगाव, शिंदखेड, वडगाव येथील शेतकरी निर्यातक्षम भेंडीचे उत्पादन घेतात. वर्षात किमान तीन पीक या शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळता ठेवतात. पण यंदा पावसानं त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरलं. सावरगावचे भेंडी उत्पादक बंडू जाधवर म्हणाले, यंदा या तीनही गावांतील जवळपास ५० ते ५५ शेतकऱ्यांनी १६ ऑगस्टला भेंडी लागवड केली. पण त्यानंतर पाऊसच गायब झाल्यानं लावलेली भेंडी वाळून गेली. शिवाय पुढेचं पीकही नाही.

निम्म्यापेक्षा जास्त मंडळांत 
५० टक्केही पाऊस नाही

बीड जिल्ह्यात एकूण ६३ महसूल मंडळे आहेत. त्यापैकी ३४ मंडळांत वार्षिक सरासरी पावसाच्या ५० टक्केही पाऊस पडला नाही. केवळ ५ मंडळांत ७० ते ७५ टक्के पाऊस पडला असून, २४ मंडळात ५० ते ७० टक्के पाऊस पडला आहे. सहा मंडळांत वार्षिक सरासरीच्या केवळ २१ ते २८ टक्केच पाऊस पडला आहे. त्यामध्ये राजुरी मंडळात केवळ २१ टक्केच पाऊस पडला आहे.

भूजलपातळीत चिंतेत घातली भर
 शिरूर कासार, धारूर तालुक्यातील भूजलपातळी ३ मीटरपेक्षा जास्त घटली आहे. तर माजलगाव तालुक्यातील भूजलपातळीत तब्बल ५.१० मीटर इतकी घट नोंदली गेली आहे. गेवराई तालुक्यातील भूजलपातळीत २.४० मीटर, पाटोदा, वडवणी, अंबाजोगाई, केज तालुक्यातील भूजलपातळीत १ मीटरपेक्षा जास्त, तर बीड, आष्टी, परळी तालुक्यांतील भूजलपातळीत ०.३७ ते ०.९० मीटरपर्यंत घट नोंदली गेली आहे. यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हाभरातील १२६ विहिरींचे सप्टेंबरअखेर निरीक्षण नोंदविले.

सोयाबीन हातचे गेले
पावसाने गरजेच्या वेळी दगा दिल्याने मोठ्या प्रमाणात पेरणी झालेल्या सोयाबीनच्या उत्पादनात हेक्टरी मोठ्या प्रमाणात घट नोंदली गेली आहे. हेक्टरी सरासरी ८ क्विंटल ३२ किलो उत्पादित होणारे सोयाबीन यंदा केवळ २ क्विंटलच पिकले.

ऊसतोडीला जाण्याचे प्रमाण वाढले 
ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख. दरवर्षी जाणाऱ्या या ऊसतोड कामगारांच्या संख्येत यंदा आजवर २० ते २५ टक्क्यांची भर पडली आहे. गेवराई तालुक्यातील ठाकरवाडीचे कल्याण चव्हाण म्हणाले, दरवर्षी गावातील ५० टक्के लोक ऊसतोडणीला जायचे. यंदा ही संख्या ७५ टक्क्यांवर गेली. चकलांबा, माटेगाव, खलेगाव, जळगाव, धोंडराई, पिंप्रीदेव, सुशिवडगाव आदी गावातूनही मोठ्या प्रमाणात लोक ऊसतोडीला चाललेत. काय करावं आताच प्यायला पाणी जनावरांना चारा नाही, उरलेलं दहा-बारा महिने धकवायचे कसे हा प्रश्न प्रत्येकासमोर हाय. अनेकांनी जनावर विकली, पण अनेकांनी ती न विकता त्यांना जगविण्यासाठी ऊसतोडीला जाण्याचा निर्णय घेतला. 

कापसाच्या व्यापारावर गदा
दरवर्षी दरदिवशी किमान ३० ते ३५ ट्रक कापूस खरेदी होणाऱ्या उमापूरच्या बाजारपेठत यंदा शुकशुकाट आहे. साधारणतः दसऱ्यापासून सुरू होणारी ही कापूस खरेदी यंदा सुरू नाही. फेब्रुवारीपर्यंत किमान चार महिने चालणारा हा धंदा बंद असल्यानं किमान पाचशेवर मजुरांच्या हाताला मिळणार काम थांबलय. उमापूर गावात जवळपास सात विहिरी, दोन बारव. आजघडीला प्रत्येकीला एक ते २ फूट पाणी. पावसाने अर्ध्यावर्ती डाव मोडल्याने गावशिवरातील चार हजार हेक्टरपैकी जवळपास ५०० हेक्टरवर होणाऱ्या हंगामी बागायतीची आशा संपल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

पाणी चाऱ्यासाठी भटकंती
किमान तीन किलोमीटर चालल्याशिवाय जनावरचं पोट भरत नाही. त्यांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जिथं पाणी मिळत तिथं जावं लागतं. यंदा पाण्यानं सारं अवघड करून टाकल्याचे गेवराई तालुक्यातील देवपिंप्रीचे काकासाहेब परदेशी व भागवत गवारे सांगत होते.

प्रतिक्रिया...
तीन एकर शेती त्यात यंदा तीन किंटल कापूस झाला. तूर वाळून चालली, मजूर लावायला परवडत नाही म्हणून स्वतः वेचतोय.
- गोरखनाथ काशीद, लिंबा खंबा, ता. शिरूर कासार, जि. बीड

पाच एकर शेती, पण यंदा काही पिकलीच नाही. दोन बैल अन जनावर जगवायची कशी हा प्रश्न. म्हणून आजवर ऊसतोडीला गेलो नाही, पण यंदा चाललोय.
- हरिभाऊ लाळगे, काळेवस्ती उमापूर, ता. गेवराई, जि. बीड

आमच्याकडंबी सात एकर शेती, आजवर कुणी ऊसतोडीला गेलं नव्हतं, पण यंदा एक मुलगा अन त्याच कुटुंब ऊसतोडणीला गेलंय. काय करावं इलाज नाही.
- अर्जुन वीर, काळेवस्ती, उमापूर, ता. गेवराई,  जि. बीड

जवळपास ४५ एकर शेती. दरवर्षी ३५ एकर कपाशी असायची, किमान अडीचशे ते तीनशे किंटल कापूस व्हायचा. यंदा मात्र १२ जुलै नंतर पावसानं खेळ मांडला. पेरनी करता आली नाही. पाऊसच नसल्यानं रब्बीची आशा नाही.
- महेश आहेर, उमापूर, ता. गेवराई, जि. बीड

दीड एकरात पाऊण एकर कपाशी अन पाऊण एकर पपई. पपईला फळ लगडली अन पाणी संपलं. पाऊण एकरात ३५ किलो कापूस झाला. प्रत्येक वर्षी मागचंच बरं व्हतं म्हणण्याची येळ आली.
- गजेंद्र काशीद, खडकी, ता. गेवराई, जि. बीड

जवळपास अडीचशे उंबऱ्याच गाव आमचं. पण प्यायला पाणी मिळणा झालं. गावातील जवळपास साठ ते सत्तर टक्के लोक ऊसतोडणीला गेलेत. पाच ते सहा एकर शेती असणारा बी यंदा जनावर घेऊन ऊसतोडणीला गेलाय.
- लक्ष्मण काशीद, खडकी, ता. गेवराई, जी. बीड

७२ च्या दुष्काळात पाणी प्यायला होत. यंदा मात्र पाणी नाही, चारा नाही अन हाताला कामही नाही. एक महिना कस बस पाणी टिकलं. गुळज बंधाऱ्यात जायकवडीतून पाणी सुटलं, तर पुढे पुरलं नाही त जलसंकट उमापूरसह वाड्या वस्त्यांवर आलं म्हणून समजा
- देविदास गवळी, मारुतीची वाडी, उमापूर, ता. गेवराई, जि. बीड

इतर अॅग्रो विशेष
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...
आजचा चंद्र हा सर्वांत जवळ : 'ग्रेट...या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या...
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...