इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या मार्गावर

पाण्याअभावी पिके जळू लागली
पाण्याअभावी पिके जळू लागली

वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत कालव्याच्या पोटचारी नसल्यामुळे कालव्याचे पाणी पोचत नाही. पाटबंधारे विभागाने पोटचारी काढून कालव्याचे पाणी देण्याची मागणी नदीकाठचे शेतकरी करू लागले आहेत.

चालू वर्षी इंदापूर तालुक्‍यातील नीरा नदी फेब्रुवारी महिन्यामध्येच कोरडी पडली असल्यामुळे नदीकाठचे शेतकरी अडचणीमध्ये आले आहेत. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील निमसाखर, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, पिठेवाडी परिसरांतील नदीला पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेल्स कोरड्या पडू लागल्या आहेत. शेतकऱ्यांनी कष्टाने जोपासलेली पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.

नदी काठचे शेतकरी यावर्षी संकटात सापडले असून नदीला पाणी नाही व कालव्याचे पाणी मिळत नसल्याचा प्रकार घडू लागला आहे. अनेक ठिकाणी नदीपर्यंत कालव्याच्या पोटचारी नसल्यामुळे पाणी जाण्यास अडचण होत आहे. नीरा डाव्या कालव्याच्या उन्हाळी हंगामाच्या दुसऱ्या आवर्तनाला दोन-तीन दिवसांनंतर सुरवात होणार आहे.

चालू वर्षी धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाणी देणे शक्‍य आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन कालव्याच्या पोटचारी काढण्यास मदत केल्यास निश्‍चित नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास मदत होणार आहे. जळण्याच्या मार्गावरती असणारी पिके वाचण्यास मोलाची मदत होणार असल्याने पाटबंधारे विभागाने पाणी देण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.

नीरा नदीमध्ये धरणातून पाणी सोडावे यासाठी इंदापूर, माळशिरस तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी मार्च महिन्यामध्ये आठ दिवस उपोषण करून रास्तारोको, काळ्या गुढ्या उभारणे, सामूहिक मुंडण करणे अशी विविध प्रकारची आंदोलने केली होती. मात्र, प्रशासनाने पाणी सोडण्यास नकार दिला होता. पाटबंधारे विभागाने किमान पोटचाऱ्यांची सोय करून पाणी देण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com