कीडरोग सर्वेक्षकांनी मांडली ठाकरे, कडू यांच्याकडे कैफियत

क्राॅपसॅप
क्राॅपसॅप

पुणे: राज्यातील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पात (क्रॉपसॅप) कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत असल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या कृषी खात्याने चौकशी करण्याऐवजी १२०० कीडसर्वेक्षकांना शिताफीने हटविले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व आमदार बच्चू कडू यांच्यासमोर सर्वेक्षकांनी आपली कैफियत मांडली.    सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, भात; तसेच फळपिकांवरील कीडरोगाचे सर्वेक्षण करून सनियंत्रण व सल्ला यासाठी क्रॉपसॅप प्रकल्प राबविला गेला. दिवसरात्र कीडसर्वेक्षकांनी मेहनत घेतल्यामुळेच या प्रकल्पाला केंद्र सरकारने ई-गव्हर्नन्स अॅवॉर्ड देत गौरविले होते. मात्र, पुरस्कार घेऊन कष्ट करणाऱ्या कामगारांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. ‘‘राज्यात ३६ जिल्ह्यांतील कीडरोग सर्वेक्षकांनी २००९ पासून कीडरोग सर्वेक्षणाचे उत्तम काम शेतकऱ्यांसोबत केले आहे. सर्व कंत्राटी सर्वेक्षक शेतकरी कुटुंबांतील असल्यामुळे या प्रकल्पात ठेकेदाराकडून होणारी लूट सहन करीत कामे सुरू ठेवली होती. मात्र, यंदा अचानक कृषी विभागाने क्रॉपसॅपचे काम काढून घेतले आहे. यामुळे शेकडो सर्वेक्षकांची उपासमार होत आहे,’’ अशी तक्रार आमदार कडू यांच्याकडे करण्यात आलेली आहे. क्रॉपसॅपचे काम सर्वेक्षकांऐवजी कृषी सहायकाला देण्यात आले आहे. ‘‘सहायकांचा या कामाला पूर्णपणे विरोध असताना यांच्यावर हे काम जबरदस्तीने लादले जात आहे. कीडरोग सर्वेक्षणाची प्रक्रिया कालमर्यादेची व जबाबदारीची आहे. असे असताना या नाजूक कामकाजासाठी कंत्राटी पद्धतीने सर्वेक्षकांना नियुक्त केले जाते. प्रत्यक्षात या कामामुळे शेतकऱ्यांना कीडरोगविषयक माहिती मिळून उत्पन्न वाढण्यास मदत झाली,’’ असे सर्वेक्षकांचे म्हणणे आहे. ‘‘या प्रकल्पात सर्वेक्षकांनी उत्तम काम केल्यामुळेच २०११ मध्ये केंद्र शासनाचा पुरस्कार कृषी विभागाला मिळाला होता. असे असतानाही ठेकेदारांच्या नादाला लागून राज्यातील १२०० शेतकरीपुत्रांना कृषी विभागाने उघड्यावर आणले आहे,’’ असे सर्वेक्षकांचे नेते यशवंत शेंडगे म्हणाले.  हिवाळी अधिवेशनात मोर्चा, मुंबईत आझाद मैदानावर धरणे, कृषी आयुक्तालयावर मोर्चा काढूनही निर्णय न घेता फक्त उडवाडवीची उत्तरे कृषिमंत्री, कृषी राज्यमंत्री तसेच आयुक्तांकडून मिळाली आहेत. आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षक लढा देणार असून पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारला जाईल, असेही श्री. शेंडगे म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com