काश्मिरात दहशतवादी हल्ल्यात 'सीआरपीएफ'चे ३० जवान हुतात्मा

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात "सीआरपीएफ'चे ३० जवान हुतात्मा
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात "सीआरपीएफ'चे ३० जवान हुतात्मा

श्रीनगर- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात "जैशे महंमद' या दहशतवादी संघटनेने आज केलेल्या नृशंस हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) ३० जवान हुतात्मा झाले. स्फोटकांनी भरलेले वाहन दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर धडकावले. बारामुल्ला जिल्ह्यातील अवंतीपुराजवळील लाटूमोड येथे झालेल्या या हल्ल्यात ४० जवान जखमी झाले आहेत. सुमारे ३५० किलो स्फोटकांनी भरलेले वाहन ताफ्यावर धडकावून दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वांत मोठा हल्ला आहे. 

जम्मू-श्रीनगर हमरस्त्यावर हा भयानक हल्ला झाला. रजा संपवून कर्तव्यावर परतत असलेल्या जवानांसह ७८ वाहनांमधून सुमारे २५०० जणांचा ताफा काश्‍मीर खोऱ्याकडे निघाला असताना, हा प्रकार घडला. "जैशे महंमद'मध्ये गेल्या वर्षी दाखल झालेला आदिल अहमद दार हा या आत्मघातकी हल्ल्याचा सूत्रधार असून, तो पुलवामा जिल्ह्यातील काकापुराचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्ला झालेले ठिकाण श्रीनगरपासून ३० किलोमीटरवर आहे. स्फोटाच्या दणक्‍यामुळे जवानांच्या बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि अन्य अनेक बसचे नुकसान झाले. स्फोटानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर गोळीबारही केला. जखमींमधील १३ जवानांची प्रकृती गंभीर असून, त्यांना लष्कराच्या श्रीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

"सीआरपीएफ'चा ताफा जम्मूहून दुपारी साडेतीन वाजता निघाला होता आणि सूर्यास्तापर्यंत तो श्रीनगरमध्ये पोहोचणे अपेक्षित होते. खराब हवामान व अन्य प्रशासकीय कारणांमुळे जम्मू-श्रीनगर हमरस्ता गेले दोन दिवस बंद होता. त्यामुळे आज निघालेल्या ताफ्यातील जवानांची संख्या जास्त होती. नेहमी एका ताफ्यातून सुमारे एक हजार जवान जातात; पण दोन दिवस हमरस्ता बंद असल्यामुळे आज निघालेल्या ताफ्यात २,५४७ जवान होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ताफ्याच्या पुढे रस्ता सुरक्षित असल्याची खात्री करणारे, तसेच चिलखती वाहनही होते. हल्ल्यात हुतात्मा झालेल्या बसमधील जवान "सीआरपीएफ'च्या ७६ व्या बटालियनचे होते. या बसमध्ये या बटालियनचे ३९ जवान होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती "सीआरपीएफ'चे महासंचालक विजय कुमार यांनी दिली, तर या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केल्याचे "सीआरपीएफ'च्या कारवाई विभागाचे महानिरीक्षक झुल्फिकार हसन यांनी सांगितले. 

या हल्ल्यानंतर केंद्रीय पातळीवरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या असून, हा दहशतवादी हल्ला असल्याचे गृह मंत्रालयाने नमूद केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे, तर "या घटनेमुळे राज्यातील २००४-०५ पूर्वीच्या स्थितीची आठवण येते,' असे जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. "पीडीपी'च्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून, दहशतवाद आणखी किती बळी घेणार, असा प्रश्‍न त्यांनी केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, तसेच कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 

आमच्या शूर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान   हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध; जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. - राहुल गांधी, कॉंग्रेसचे अध्यक्ष 

दुसरा मोठा हल्ला  उरीमधील लष्करी तळावर सप्टेंबर २०१६ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरचा आज झालेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे. उरीतील ब्रिगेड तळावर चार दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचे १९ जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर लष्कराने "सर्जिकल स्ट्राइक' करून पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवादी तळ उद्‌ध्वस्त केले होते.

हल्ला कसा झाला? 

  • पहाटे ३.३० च्या सुमारास जवानांच्या वाहनांचा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे निघाला. 
  • श्रीनगरपासून वीस किलोमीटर अंतरावर असताना अवंतीपुरा येथे "जैशे महंमद'च्या दहशतवाद्यांनी सुरक्षा यंत्रणा भेदत ताफ्यातील एका वाहनावर आपली गाडी धडकवली. 
  • ताफ्यातील वाहनामध्ये ३९ जवान होते. धडक बसताच मोठा स्फोट होऊन वाहनाचा केवळ सांगाडा उरला. स्फोटामुळे वाहनाचे तुकडे शंभर मीटरपर्यंत फेकले गेले. ताफ्यातील इतर वाहनांचेही नुकसान झाले. 
  • काही गाड्यांवर गोळ्यांच्याही खुणा. लपून बसलेल्या इतर दहशतवाद्यांनीही गोळीबार केल्याची शक्‍यता. 
  • दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर स्फोटके कशी आणि सुरक्षा यंत्रणा कशी भेदली, याचा तपास सुरू
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com