साताऱ्यातील धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे धरणांतील पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत प्रमुख धरणांत अधिक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. राज्याच्या वीज निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कोयना धरणात एकूण १८.७४ टीएमसी अधिक पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात सर्वच धरण परिसरात पावसाचा जोर वाढू लागल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. गतवर्षीच्या तुलेनत आजअखेर सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असल्याने धरणांत गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा झाला आहे. शुक्रवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरण क्षेत्रात १९५, नवजा येथे १८९, महाबळेश्वर येथे १६५ मिमी पाऊस झाला आहे.

कोयना धरणात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पाणीसाठ्यात ४.९१ टीएमीसीने वाढ झाली असून सध्या कोयना धरणात ५७.८४ टीएमसी म्हणजेच ५५.०५ टक्के पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणात गतवर्षीच्या तुलनेत १८.७४ टीएमसी अधिक पाणीसाठा आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत सरासरी २१७५ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी आजपर्यंत सरासरी १५२५ मिमी पाऊस झाला होता. इतर धरणांतील पाणीपातळीतदेखील वाढ झाली आहे. या प्रमुख धरणांत उरमोडीचा अपवाद वगळता गतवर्षीच्या तुलनेत जादा पाणीसाठा आहे.

धरण क्षेत्रातही पाऊस झाल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. सध्या धोम धरणात ५५.०५, उरमोडीत ५२.७८, कण्हेरमध्ये ४६.३६, तारळीत ४५.५४, धोम-बलकवडीत ५२.५९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जुलै व ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाण्याची आवक धरणात होत असते. जुलै महिन्याच्या सुरवातीपासून दमदार पाऊस झाला असल्याने कण्हेर व तारळी ही धरणे वगळता सर्वच धरणांतील पाणीसाठ्याची टक्केवारी ५० वर गेली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास यावर्षी धरणे अपेक्षेपेक्षा लवकर भरतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  

जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टीएमसी)
धरण २०१७ २०१८
कोयना ३९.१० ५७.८४
धोम ४.०९ ५.४५
उरमोडी ५.३० ५.२६
कण्हेर ३.४४ ४.६८
तारळी २.४४ २.६६
धोम-बलकवडी १.२२ २.०८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com