चित्री प्रकल्पात ६६ टक्के पाणीसाठा

धरणसाठा
धरणसाठा
गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असली तरी यंदा गडहिंग्लज तालुक्‍यात समाधानकारक पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांना उन्हाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. तालुक्‍याला लाभदायी ठरलेल्या चित्री प्रकल्पात ६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २२ टक्के पाणीसाठा अधिक आहे. हा पाणीसाठा जुलै २०१८ पर्यंत पुरेसा ठरणारा आहे.
 
तीन लघुपाटबंधारे प्रकल्पांत सरासरी १० टक्के पाणीसाठा अधिक आहे. पाटबंधारे विभागाने केलेल्या योग्य नियोजनाचा यंदा फायदा झाला आहे. परिणामी, भविष्यात उपसाबंदीचा कालावधी कमी होण्याची शक्‍यता आहे. 
 
गतवर्षी बसलेल्या फटक्‍यामुळे पाटबंधारे विभागाने यंदा सुरवातीपासूनच काळजी घेतली. हिरण्यकेशी नदीमध्ये पावसाचे पाणी योग्य वेळी अडविले. त्यामुळे यंदा उपसाबंदी ६ जानेवारीला लागू करावी लागली. गतवर्षीपेक्षा हा कालावधी एक महिन्याने अधिक होता. उपसाबंदीचा कालावधी गतवर्षीपेक्षा पाच दिवसांनी कमी म्हणजेच १५ दिवसांचा ठेवला आहे.
 
यंदा १०० टक्के भरलेल्या चित्री प्रकल्पातून दोन वेळा पाणी सोडले आहे. सध्या १८० क्‍युसेकने तिसरा विसर्ग सुरू आहे. सध्या चित्री प्रकल्पात १२७० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. गतवर्षी तो ८३८ दशलक्ष घनफूट होता. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत २२ टक्के पाणीसाठा अधिक आहे. 
 
पाटबंधारे विभागाने केलेल्या योग्य नियोजनामुळे यंदा अधिक पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्याचा पाणीसाठा आणि भविष्यात असणारी गरज याचा विचार करता उपसाबंदीचा कालावधी कमी होण्याची शक्‍यता आहे. तालुक्‍यातील सहा लघुपाटबंधारे प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पांत गतवर्षीपेक्षा सरासरी १० टक्के पाणीसाठा अधिक आहे, तर तीन प्रकल्पांत गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणी साठा आहे.
 
पूर्व भागात पाऊस कमी झाल्यामुळे ही परिस्थिती आहे. मात्र, हे पाणी पिण्यासाठी जुलै २०१८ पर्यंत पुरेसे ठरेल, असा विश्‍वास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com