मराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा तीन वर्षांतील लघुत्तम पातळीवर आला आहे. ८६८ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये केवळ २०.२१ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या केवळ २२.९४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी ७ नोव्हेंबरअखेर या प्रकल्पांमध्ये ७० टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता. मोठ्या प्रकल्पांपैकी माजलगाव प्रकल्पात उणे अकरा, सिद्धेश्वर प्रकल्पात उणे दोन, मांजरा प्रकल्पात उणे पाच तर सिनाकोळेगाव प्रकल्पात उणे ५६ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पांमधील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचा वेगही वाढतच चालला आहे. ७ नोव्हेंबरअखेरच्या आठवड्यात १.८५१० दलघमी पाणीसाठ्याचे बाष्पीभवन झाल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

७५ मध्यम प्रकल्पांत केवळ १४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. ७ नोव्हेंबर २०१६ अखेर या प्रकल्पांमध्ये ७७ टक्‍के तर २०१७ मध्ये ६० टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता. सर्वाधिक संख्येने असलेल्या ७४९ लघु प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती चांगली नाही. या प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.  ७ नोव्हेंबर २०१६ अखेर या लघु प्रकल्पांमध्ये ७४ टक्‍के तर २०१७ मध्ये ४८ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता.

निम्म्या मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाणी नाही मराठवाड्यातील एकूण ७५ मध्यम प्रकल्पांपैकी निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे ३८ मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ११, बीडमधील १२, जालन्यातील ५, लातूरमधील २, उस्मानाबादमधील ७ तर नांदेड जिल्ह्यातील एका प्रकल्पाचा समावेश आहे.

मराठवाड्यात एकूण ७४९ लघु प्रकल्प आहेत. त्यापैकी जालना, बीड, लातूरमधील लघु प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा चिंताजनक  असाच आहे. जालना जिल्ह्यातील ५७ लघु प्रकल्पांत केवळ २ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. बीड जिल्ह्यातील १२६ लघु प्रकल्पांत ४ टक्‍के, लातूरमधील १३२ लघु प्रकल्पांत केवळ ७ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com