खानदेशातील प्रकल्पांमध्ये ४५ टक्के पाणीसाठा

पाणीसाठा
पाणीसाठा
जळगाव  ः खानदेशातील लहान व मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठा सरासरी ४५ टक्‍क्‍यांवर आला आहे. महत्त्वाच्या गिरणा, हतनूर व पांझरा या धरणांमधील साठा ५० टक्‍क्‍यांखाली आला असून, परिणामी पिण्याच्या पाण्याचे संकटही पुढे गंभीर बनेल की काय अशी स्थिती आहे. 
 
धुळे जिल्ह्यातील पांझरा प्रकल्प परतीच्या पावसात बऱ्यापैकी भरला. त्यातून पाणीही सोडण्यात आले. परंतु आजघडीला या प्रकल्पातील साठा ६० टक्‍क्‍यांखाली आला आहे. या प्रकल्पामुळे धुळे व शिंदखेडा तालुक्‍यांतील सुमारे १० हजार हेक्‍टर शेतीला लाभ होतो.
 
परंतु पिण्याच्या पाण्याचा वाटाही या प्रकल्पावर असल्याने शेतीसाठी मुबलक पाणी यंदाही मिळू शकले नाहीत. त्यातच उन्हाळा सुरू होऊन एक महिना झालेला असताना या प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. धुळ्यातील इतर मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा ३० टक्केच आहे. शिंदखेडा, साक्रीमधील प्रकल्प आटू लागले आहेत. बुराई प्रकल्पात तर जेमतेम पाणीसाठा आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा, प्रकाशा बॅरेजमध्ये पाणीसाठा आहे. त्याचा उपयोग संबंधित बॅरेजच्या काठावरील गावांची शेती व पिण्याचे पाणी यासाठी होत आहे. या बॅरेजमध्येही ६० टक्के पाणीसाठा आहे.
 
जळगाव जिल्ह्यातील बहुळा, मन्याड, तामसवाडी, पद्मालय आदी लघू व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा स्थिती बिकट असून, ते कोरडेठाक झाले आहे. मन्याडमधून एकच आवर्तन शेतीसाठी सोडले. जामनेरातील तोंडापूर प्रकल्पातदेखील ५५ टक्के पाणीसाठा आहे. रावेरमधील सुकी, अभोळा, मंगरूळ या प्रकल्पांमधील सरासरी साठा ४० टक्के आहे. यंदा मंगरूळ धरण फक्त १०० टक्के भरले होते. त्यात सध्या ६३ टक्के पाणीसाठा आहे. यावलमधील मोर प्रकल्पातील साठाही ३५ टक्‍क्‍यांवर आला आहे. 
 
शिरपूर (जि. धुळे) तालुक्‍यातील अनेर प्रकल्पातील साठाही ३० टक्‍क्‍यांवर आला आहे. सातपुडा पर्वतातून येणाऱ्या नद्या यंदा भरपावसाळ्यात कोरड्या होत्या. त्यामुळे सातपुडा पर्वतालगतचे प्रकल्पही कोरडे पडू लागले आहेत. 
गिरणा धरणातील पाणीसाठा ३५ टक्‍क्‍यांवर आहे. त्यातून यंदा दोनच आवर्तने सोडली. हतनूरमध्येही फक्त ३० टक्‍के पाणीसाठा असून, त्यातून तीन आवर्तने सोडली होती. पुढे भुसावळ शहरासह जळगावमधील औद्योगिक वसाहतीला या प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा केला जाणार असून, जूनपर्यंत हा प्रकल्पही तळ गाठेल, असे सांगण्यात आले.
 
गिरणा धरणातून मंगळवारी (ता. ३) पिण्याच्या पाण्यासाठी नदीत आवर्तन सोडले जाणार आहे. गिरणा धरणावर पाचोरा, चाळीसगाव, भडगावसह इतर गावांच्या पिण्याच्या पाण्याची पूर्ण भिस्त आहे. एप्रिलमध्येच खानदेशातील प्रमुख व लघू प्रकल्प तळ गाठण्याच्या स्थितीत असल्याने पावसाळा सुरू होईपर्यंत काय काय समस्यांना तोंड द्यावे लागेल, असा मुद्दाही उपस्थित झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com