उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांमध्ये १७२ टीएमसी पाणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
नाशिक : उर्ध्व गोदावरी खोऱ्यामध्ये या वर्षी सरासरीपेक्षाही खूप अधिक प्रमाणात पाऊस पडल्यामुळे या खोऱ्यातील धरणांमध्ये १७२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 
 
उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील गोदावरी, कादवा, मुळा, प्रवरा या नद्यांच्या खोऱ्यांमधील सरासरी पावसाच्या आकडेवारीच्या अभ्यासानुसार तेथे १५७ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. या वर्षी सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस झाल्यामुळे त्यापेक्षा १५ टीएमसी साठा अधिक होऊन जायकवाडीतूनही पाण्याचा विसर्ग झाला आहे.
 
 उर्ध्व गोदावरी खोऱ्यात प्रामुख्याने गोदावरीसह कादवा, मुळा व प्रवरा या नद्यांच्या उपखोऱ्यांचा समावेश होतो. औरंगाबाद जिल्ह्यासह नाशिक व नगर जिल्ह्यातील गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यांचा समावेश असलेल्या या खोऱ्यात नाशिक जिल्ह्यात १७, नगर जिल्ह्यात ९ व औरंगाबाद जिल्ह्यात एकमेव जायकवाडी असे २७ मोठे व मध्यम प्रकल्प आहेत.
 
सर्व धरणांच्या पाणीसाठ्याची क्षमता १७५ टीएमसीच्या आसपास आहे. तरी या खोऱ्यात केवळ १५७ टीएमसी पाणी उपलब्ध असल्यामुळे हे तुटीचे खोरे म्हणून ओळखले जाते. आधीच या तुटीच्या खोऱ्यात पाणीवाटपावरून होणारे वाद व बिगर सिंचनासाठी पाण्याचा वाढत जाणारा वाटा यामुळे या खोऱ्यातील कृषी अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे.
 
या वर्षी नगर व नाशिक या दोन्ही प्रमुख जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे १७२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यामुळे या वर्षापुरते तरी पाण्याच्या वाटपावरून होणारे वाद थांबणार आहे.
 
गोदावरी उर्ध्व खोऱ्यात नाशिक, नगर व औरंगाबद या तीन जिल्ह्यांपैकी नाशिक जिल्ह्यातील नद्यांमध्ये ९७. ४ टीएमसी पाणी वाहत आले असून त्यातील ४०.१५ टीएमसी पाणी १७ धरणांमधून अडवले गेले आहे; तर उर्वरित ५७.२५ टीएमसी पाणी नांदूर मध्यमेश्‍वर धरणातून जायकवाडीसाठी सोडून दिले आहे.
 
नगर जिल्ह्यात साधारणपणे ६७ टीएमसी पाणी नद्यांमध्ये आले असून, त्यातील ५७ टीएमसी पाणी धरणांमध्ये अडविले असून उर्वरित साधारण १० टीएमसी पाणी जायकवाडीकडे वाहून गेले आहे. जायकवाडी धरणात या वर्षी ७८ टीएमसी पाणी आल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.
 
यावरून औरंगाबाद जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातून जायकवाडीत ११ टीएमसी पाणी आले आहे. उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील तीन जिल्ह्यांपैकी नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ९७.४ टीएमसी (५६ टक्के) पाणी उपलब्ध असूनही नाशिक जिल्ह्यासाठी त्यातील केवळ २६ टीएमसी (१५ टक्के) वापर होतो. 
 
या असमान वितरणामुळे गोदावरी खोऱ्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड, येवला, सिन्नर ही कायमस्वरूपी तालुके पाण्यापासून वंचित राहिले आहेत.
 
उर्ध्व गोदावरी खोरे पाणीसाठा (टीएमसी)
 
जिल्हा जमा झालेले पाणी पाणीसाठा पाणी वापर
नाशिक ९७ ४० २६
नगर ६७ ५७ ७१
औरंगाबाद ११ ७६ ७६

(दारणा खोऱ्यातील १४ टीएमसी पाणी नगरमधील कोपरगाव व राहता तालुक्‍यासाठी वापरले जाते)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com