दारणा धरण ५०, तर पुनंद १०० टक्के भरले

दारणा धरण ५०, तर पुनंद १०० टक्के भरले
दारणा धरण ५०, तर पुनंद १०० टक्के भरले

इगतपुरी, जि. नाशिक  :  इगतपुरी तालुक्यात चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. चोवीस तासांत दारणा, मुकणे, भावली धरणांच्या साठ्यात वाढ होत असून, दारणा धरण ३ हजार ५९० दलघफूट म्हणजे एकूण ५० टक्के भरले आहे.

पावसाचा जोर आणखी वाढल्यास पुढील पाच-सात दिवसांत दारणा पूर्ण क्षमतेने भरेल. या धरणाच्या सहा वक्राकार स्वयंचलित दरवाजापर्यंत पाणी टेकले असून, येत्या दोन-तीन दिवसांत पाण्याची पातळी वाढल्यास धरणातून आवर्तन सुरू करण्यात येईल, असा अंदाज आहे. मुकणे, भावली, भाम, कडवा आदी धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे.

शुक्रवारी (दि. १३) सकाळी ६ वाजेपर्यंत इगतपुरी येथे ६५.० मिमी, घोटी येेथे ४१ मिमी, वाडीवर्ऱ्हे ३९  मिमी, नांदगाव बुद्रुक ३७ मिमी, टाकेद १२ मिमी तर धारगाव येथील वैतरणा पट्ट्यात सर्वाधिक ८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. साडेतीन हजार मिमी पावसाची सरासरी असलेल्या इगतपुरी तालुक्यात आतापर्यंत एकूण १२१९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी दिवसांत इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे भात आवण्या जोरात सुरू असून, अनेक ठिकाणी त्या पूर्ण झाल्या आहेत. दारणा धरण ६० टक्के भरल्यास त्यातून पाण्याचे आवर्तन तत्काळ सोडले जाईल, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

संततधार पावसाने जनजीवन प्रभावित चार दिवसांपासून अविरत बरसत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. आधीच इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात पावसाने ते आणखी खराब झाले आहेत. अस्वली-मुंढेगाव-घोटी, घोटी-काळुस्ते आदी रस्त्यांवर खड्डे पडले असून, वाहनचालकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. तर छोठे-मोठे अपघातही घडत आहेत.

सटाणा, देवळा, कळवण तालुक्यांचा पाणी प्रश्न सुटणार गिरणा खोऱ्यातील पुनंद परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने पुनंद धरण भरले आहे. धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जलसाठा स्थिर ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ लागल्याने गिरणा नदीला पूर आला आहे. नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. पुनंद धरणातील या पाणीसाठ्यामुळे सटाणा, देवळा, कळवण तालुक्यांतील ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. धरणातून अठराशे क्युसेस पाण्याचा विसर्ग होऊ लागल्याने गिरणा नदीला यंदाचा पहिलाच पूर आला आहे. हे पाणी शुक्रवारी (ता. १३) सायंकाळपर्यंत लोहोणेर गिरणा पुलापर्यंत येऊन पोचल्याने सटाण्यासह देवळा पाणीपुरवठ्यासह शेती व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे चित्र आहे.

कळवण व गिरणा तसेच पुनंद परिसरात काल मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याबरोबर पश्चिमेकडील डोंगररांगांमधून पाण्याचे प्रवाह वाहू लागल्याने पुनंद खोऱ्यात सर्वच नाले-ओढे वाहू लागले. पुनंद धरणातील पाणीसाठ्यात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गिरणा दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र सध्या खामखेडा परिसरात पहावयास मिळत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने कळवणच्या पश्चिम भागात हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com