कोपर्डी प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा

कोपर्डी प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा
कोपर्डी प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा

नगर : देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने बुधवारी (ता. २९) फाशीची शिक्षा सुनावली. या निकालाकडे देशाचे लक्ष होते. या निकालामुळे पीडितेला अखेर न्याय मिळाला, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरमातील दोषींना फाशी देण्याची पीडितेच्या कुटुंबीयांचीही मागणी होती.  

निकालाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा न्यायालय व परिसरात सुमारे दोनशे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रकरणातील तिन्ही दोषींना आज सकाळी न्यायालयाच्या मागील दरवाज्यातून आत आणण्यात आले. निकाल ऐकण्यासाठी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालय कक्षात खचाखच गर्दी होती. पीडीतेचे नातेवाईक, माध्यम प्रतिनिधी, वकीलांनी न्यायालय कक्ष पूर्ण भरून गेला होता. साध्या वेशातील पोलिसही परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. कोपर्डी (ता. कर्जत) येथेही चाळीस पोलिसांसह राज्य राखीव व शीघ्र कृती दलाचे पथक तळ ठोकून आहेत. नगर शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील सगळ्याच भागांत पोलिसांचा पहारा आहे.

कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून झाला होता. या खटल्यातील दोषी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांनाही विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तिघांही फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती, तर आरोपीचे वकील ऍड. योहान मकासरे, ऍड. बाळासाहेब खोपडे व अॅड. प्रकाश आहेर यांनी कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली होती.

काय आहे कोपर्डी प्रकरण? कोपर्डी येथील तुकाई लवण वस्ती परिसरात 13 जुलै 2016 रोजी सायंकाळी सात वाजता नववीत शिकणारी शाळकरी पीडित मुलगी आजोबांच्या घरी मसाला आणण्यासाठी गेली होती. मसाला घेऊन ती पुन्हा घराकडे निघाली असता जितेंद्र शिंदे याने तिला रस्त्यात अडविले. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला व त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. प्रतिकारात पीडितेचे दोन्ही हात मोडले होते.

पीडितेच्या चुलत्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी आरोपी जितेंद्र शिंदे याला श्रीगोंदे येथून ताब्यात घेतले. त्यानंतर चार दिवसांनी संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना अटक करण्यात आली.

न्यायालयाने तिन्ही आरोपींविरुद्ध कट रचून अत्याचार व खून केल्याचा आरोप ठेवला. या खटल्यात 31 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात वैद्यकीय अधिकारी, पीडितेच्या मैत्रिणी, चुलत आजोबा यांच्या साक्षी महत्त्वाच्या  ठरल्या. सरकार पक्षाने 24 परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी न्यायालयात मांडली आणि ती सिद्ध केली. सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी आरोपीला दोषी ठरविले. सरकार पक्षातर्फे राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com