वऱ्हाडात साडेचार लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला (प्रतिनिधी) ः शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा थेट लाभ मिळत नसल्याने टीकेची धनी ठरलेली योजना अाता वेगवान बनली अाहे. दर दिवसाला कर्जमुक्त झालेल्यांचे अाकडे वाढत अाहेत. वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांत चार लाख ४३ हजार ६७० शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरलेले असून त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली अाहे. 

शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेसाठी जे शेतकरी पात्र होते, परंतु ते अर्ज करू शकले नाहीत, अशा शेतकऱ्यांनाही  या योजनेत सामावून घेतले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ही संख्या वाढू शकते. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाचे दीड लाख रुपयांपर्यतचे कर्ज माफ करण्यात अाले. तर नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे.

कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांना योजनेत सामावून घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत रक्कम जमा करण्याची प्रक्रियेने वेग घेतला आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त झाल्याचे संदेश मोबाईलवर मिळू लागले अाहेत.

अकोल्यात सव्वा लाख शेतकरी पात्र कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख २५ हजार ४९८ शेतकरी पात्र ठरले आहेत. यामधील ९४ हजार ३४५ शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली आहे. तसेच (ओटीएस) एकरकमी योजनेंतर्गत १२ हजार २०७ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. जिल्ह्यातील दीड लाख पर्यंतचे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे खाते ‘निल’ करण्यात आले आहे.

वाशीममध्ये ९६ हजार शेतकरी कर्जमुक्त जिल्ह्यातील ९५ हजार ८६३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यामध्ये ७१ हजार ९५४ शेतकरी हे कर्जमाफी अंतर्गत तर सात हजार ३६४ शेतकऱ्यांना ‘वन टाईम सेटलमेंट’ योजनेचा लाभ मिळणार आहे. शिवाय १६ हजार ५४५ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ सुद्धा मंजूर करण्यात आला आहे.

बुलडाण्यात दोन लाख २२ हजार शेतकरी पात्र योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख २२ हजार ३०९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र झाले आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्राप्त याद्यांची छाननी करण्यात आली. छाननीनंतर पात्र शेतकऱ्यांच्या ग्रीन याद्या बँकांना पाठविण्यात आल्या. या ग्रीन यादीत जिल्ह्यामध्ये दोन लाख २२ हजार ३०९ शेतकरी पात्र असून यामधील एक लाख ८० हजार ७८६ शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली आहे. तसेच (ओटीएस) एक रकमी योजनेंतर्गत ४१ हजार ५१८ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात अाली. अशाप्रकारे एकरकमी व सरसकट कर्जमाफी याप्रमाणे जिल्ह्यात दोन लाख २२ हजार ३०९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत.

अधिवेशनाचा इम्पॅक्ट गेले काही दिवस विविध तांत्रिक अडचणींमध्ये अडकलेली कर्जमाफीची प्रक्रिया नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर अाता गतिशील बनली अाहे. कर्जमाफीची माहिती देण्यास चालढकल करणारे प्रशासन अाता स्वतः पुढाकार घेत माहिती द्यायला पुढे अाले अाहे. कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत वरिष्ठांनी माहिती देण्याबाबत निर्बंध घातल्याचे जिल्हा उपनिबंधकांकडून वारंवार सांगितले जात होते. अाता याच प्रशासनाकडून तपशिलवार माहिती उपलब्ध करून देण्याची धडपड सुरू झाली अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com