दुधाच्या कमिशन स्पर्धेला चाप लावण्याचा निर्णय
दुधाच्या कमिशन स्पर्धेला चाप लावण्याचा निर्णय

दुधाच्या कमिशन स्पर्धेला चाप लावण्याचा निर्णय

पुणे: दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये जादा दर मिळणे सुकर होण्यासाठी डीलरच्या कमिशनच्या सध्याच्या स्पर्धेला लगाम घालण्याचा निर्णय राज्यातील दूध डेअरीचालकांनी घेतला आहे. शेतकऱ्यांना दूधदर देण्यात डीलर, डिस्ट्रिब्यूटर्सच्या कमिशनचा अडथळा येतो, असे अनेकदा चर्चेत येत असते. कमिशनसोबतच विविध स्कीमदेखील दिल्या जात असल्यामुळे सध्या दूध डेअरीचालकांचे खर्च वाढलेले आहेत. कमिशनच्या स्पर्धेत तग न धरल्यास संबंधित डेअरीच्या विक्रीवरदेखील परिणाम होतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.  राज्यातील सहकारी दुग्ध प्रकल्प व खासगी डेअरीचालकांच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत कमिशनचा मुद्दा उपस्थित झाला होता. २३० प्रकल्पांमधील ५५० प्रतिनिधी या बैठकीला आले होते. कमिशनमधील स्पर्धा संपविण्यासाठी प्रत्येक डेअरीला मर्यादा आखून घ्याव्या लागतील. त्यामुळे अंतर्गत खर्चावर मर्यादा येतील. तसेच, समान कमिशन ठेवल्यास बाजारपेठेतील स्पर्धेला आळा बसेल, असे या वेळी सांगण्यात आले.  राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी ‘अॅग्रोवन’ला सांगितले, की दुधाची खरेदी झाल्यानंतर पिशवीबंद दूध विकताना डीलरला कमाल दोन रुपये आणि डिस्ट्रिब्युटरला कमाल तीन रुपये अशी पाच रुपये गाळा म्हणजे गॅप ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. गाय दुधात किंवा इतर कोणत्याही दुधासाठी डीलर ते एमआरपी यांच्यात फक्त पाच रुपये गाळा असावा, असे डेअरीचालकांनी ठरविले आहे. कारण, तसे केले तरच शेतकऱ्याला पाच रुपये जादा देता येतील. ‘‘सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी करणे ते पिशवीबंद करून डीलरपर्यंत नेण्यात १२ रुपये खर्च होतात. शेतकऱ्याला २५ रुपये दिल्यास एकूण खर्च ३७ रुपये होतो. त्यात पुन्हा डीलर व डिस्ट्रिब्युटरचे कमिशन पाच रुपये दिल्यास पिशवीबंद दुधाची किंमत ४२ रुपये होते. सध्या मार्केटला दुधाची एमआरपी ४२ रुपये इतकीच आहे. त्यामुळेच ग्राहकांवर सध्या कोणताही बोजा न टाकता डेअरीचालक शेतकऱ्याला पाच रुपये सहजपणे जादा देऊ शकतात,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.  कमिशनराज संपण्याची शक्यता नाहीः नरके  इंडियन डेअरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष व गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके म्हणाले, की शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे गोकुळकडून अतिशय उच्च प्रतीचे दूध आम्ही केवळ ३.७० रुपये कमिशन ठेवून विकतो. मात्र, गोकुळचे दूध उच्च प्रतीचे असूनही अनेक ठिकाणी विकले जात नाही. कारण, विक्रेत्यांना कमिशन कमी असते. बाजारात दूध विकताना गुणवत्तेपेक्षाही कमिशनला महत्त्व असल्याने हलक्या दर्जाचे दूध १० ते १५ रुपये कमिशन ठेवून खपविले जाते. ही स्पर्धा संपविली पाहिजे. मात्र, खासगी किंवा सहकारी दुधाच्या एमआरपीवर कोणाचेही बंधन नसल्याने कमिशनराज संपुष्टात येण्याची शक्यता वाटत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com