कांदा अायातीचा दरावर परिणाम होणार नाही ः होळकर

कांदा अायातीचा दरावर परिणाम होणार नाही ः होळकर
कांदा अायातीचा दरावर परिणाम होणार नाही ः होळकर
नाशिक : कांदा हा ओपन जनरल लायसेन्स (ओजीएल)मध्ये असल्यामुळे कांदा कुणीही आयात करू शकतो, त्याला शासनाच्या परवानगीची आवश्‍यकता नाही. मुळात जगभरात कांद्याचे उत्पादन घटले असून, कांद्याचे दर तेजीत आहेत. केंद्राच्या मूल्य स्थिरीकरण निधी व्यवस्थापन (प्राइस स्टॅबिलायझेशन फंड) समितीने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचा कांद्याच्या सध्याच्या दरावर काहीही परिणाम होणार नाही. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे नाफेडचे माजी संचालक चांगदेव होळकर यांनी सांगितले. 
 
कांदा आयातीची शक्‍यता धूसर
श्री. होळकर म्हणाले, की नैसर्गिक आपत्तींसह विविध कारणांमुळे जगभरात कांद्याची आवक घटली आहे. पाकिस्तान, इजिप्त, चीन, जपान या देशांत कांदा उत्पादनाची स्थिती अडचणीचीच आहे. पाकिस्तानमध्ये कांद्याचे दर भारतीय कांद्यापेक्षा अधिक आहेत. चीन आणि इजिप्तमधून कांदा येऊ शकतो. मात्र, बाजारभावाची स्थिती पाहता कांदा आयात करणे व्यापाऱ्यांना व्यवहार्य ठरणार नाही. नाहीतर आतापर्यंत व्यापारी थांबले असते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 
कांदा आयातीचा निर्णय हे सरकारचे नाटक आहे. मुळात कांदा उपलब्ध किती? उत्पादन किती? याची निश्‍चित माहिती कोणत्याच सरकारी यंत्रणेकडे नाही. कांदा आयात करण्यासारखी स्थिती नाही. या स्थितीत ‘कांदा आयात करू’ ही फक्त वल्गना आहे. हा कांदा व्यापारातील घटकांना घाबरविण्याचा प्रयत्न आहे.  
- चांगदेव होळकर, माजी वरिष्ठ संचालक, नाफेड
 
कांद्याला मुक्त बाजाराचा लाभ कधीच मिळू दिला जात नाही. कांद्याची निर्यात नेहमी रोखली जाते. कांद्याचे नुकसान झाले तेव्हा प्रतिक्विंटलला १०० रुपये अनुदान देण्यासारखे निर्णय घेऊन कांदा उत्पादकांची चेष्टा केली जाते. स्टॉकवर धाडी टाकल्या जातात. नैसर्गिक आपत्ती आणि बाजाराच्या कारणाने याला दर मिळत असताना त्यात मात्र अडथळे आणले जातात. कांद्याच्या आयातीचा निर्णय निषेधार्ह आहे. 
- मिलिंद मुरुगकर, अर्थतज्ज्ञ
 
कांद्याची उपलब्धता पुरेशी आहे. नवीन कांदाही बाजारात येण्यास सज्ज झाला आहे. गुजरातेतील कांदा हंगामही सुरू होण्याच्या मार्गावर आहे. या स्थितीत कांदा आयातीची गरजच नाही. कांदा आयातीने खाणाऱ्याला फार काही मिळणार नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होईल. व्यापारी आणि मध्यस्थच त्याचा फायदा उठवतील.
- डॉ. सतीश भोंडे, माजी अतिरिक्त संचालक, एनएचआरडीएफ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com