सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारी

सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारी
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारी

सांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील आणि प्रतीक पाटील हे शनिवारी (ता. १६) दिल्लीत दाखल झाले. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची ते भेट घेणार होते; मात्र भेट झाली नाही. त्यामुळे सांगलीच्या जागेचा निर्णय न झाल्याने सर्वांचे लक्ष दिल्लीच्या निर्णयाकडे लागून आहे.  तसं पाहिलं तर सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला. गेली ४० वर्षे वसंतदादा घराण्याला सांगली जिल्ह्याने निवडून दिले. मात्र, २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेत काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला. या निवडणुकीत वसंतदादा किंवा पतंगराव कदम यांच्या घराण्यातील व्यक्तींना उमेदवारी द्यावी अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा होती; मात्र विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला, त्यामुळे हा विषय प्रलंबित पडत गेला.  दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आघाडीने दोन जागा देण्याचे ठरले. यातील एक जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून, तर दुसरी जागा काँग्रेसच्या कोट्यातून देण्याचे ठरले.  वर्धा किंवा सांगलीची जागा द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली. त्यानुसार सांगलीची जागा स्वाभिमानी पक्षाला सोडण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विचार सुरू केला. सांगलीची जागा देण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठी तयार असल्याची चर्चा शुक्रवारी समोर आल्याने सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. काँग्रेस भवनला टाळेदेखील ठोकले. ही जागा काँग्रेसकडेच ठेवण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.  काँग्रेसचे नेते विशाल पाटील आणि विश्‍वजित कदम यांनी सांगलीची जागा काँग्रेसकडेच ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यानंतर विशाल पाटील आणि श्रीमती शैलजा पाटील दोघे शनिवारी दिल्लीत दाखल झाले. तर, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. ‘‘सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. आणीबाणीतही काँग्रेसने हा बालेकिल्ला राखला होता. आताही जागा लढवण्यास तयार असून काँग्रेसकडेच जागा ठेवावी,’’ अशी मागणी सोनिया गांधींकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, शनिवारी सोनिया गांधी यांच्याशी भेट होऊन शकली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com