साखर आयात शुल्क, निर्यातीवर निर्णय लवकर

साखर आयात शुल्क, निर्यातीवर निर्णय लवकर
साखर आयात शुल्क, निर्यातीवर निर्णय लवकर

बारामती, जि. पुणे  ः भारतातील साखर उद्योगात उद्भवलेल्या अभूतपूर्व समस्येसंदर्भात गुरुवारी (ता. २५) इस्माच्या इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) पदाधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयात उच्चस्तरीय बैठक झाली. या वेळी झालेल्या चर्चेत सरकारच्या वतीने आयात शुल्क १०० टक्के करण्यास व अतिरिक्त उत्पादित साखर निर्यातीसाठी सरकार लवकरच धोरण जाहीर करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दुसरीकडे साखर कारखान्यांनीही उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत साखर विकण्याची घाई करू नये, असे आवाहनही या चर्चेदरम्यान सरकारी सूत्रांनी केले.  ‘इस्मा’चे अध्यक्ष गौरव गोयल, उपाध्यक्ष रोहित पवार, महासंचालक अविनाश वर्मा यांच्या शिष्टमंडळाची गुरुवारी (ता. २५) दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. गेल्या महिन्याभरातील ही चौथी बैठक होती. या बैठकीत सरकारी सूत्रांनीही आगामी सरकारी धोरणांबाबत पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. या वेळी पदाधिकाऱ्यांनी साखरेचा उत्पादन खर्च ३३०० रुपये प्रतिक्विंटल असताना, साखर आता २८०० रुपयांवर घसरली असल्याचे निदर्शनास आणून दिले. या परिस्थितीमुळे आज देशात एफआरपीपेक्षा अधिक दर जाहीर केलेल्या कारखान्यांची पंचाईत झाली असून, अनेक कारखान्यांना एफआरपीएवढी रक्कम देणेही अडचणीचे झाल्याचे स्पष्ट केले. परिस्थिती खूप वाईट असून, उत्तर प्रदेशात ऊस खरेदीतील ३८०० कोटींची देणी थकली असल्याचेही त्यांनी सांगितले.  या बैठकीविषयी इस्माचे उपाध्यक्ष रोहित पवार यांनी ‘सकाळ-ॲग्रोवन’ला माहिती दिली. ते म्हणाले, की आम्ही महाराष्ट्रातील साखर उद्योगाची स्थिती समोर आणली, तेव्हा उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने साखर विकू नका व विकण्याची घाई करू नका, जेवढी साखर ज्या दरात विकणे योग्य आहे, तेवढीच विकावी, असाही सल्ला वरिष्ठ पातळीवरून दिला. येत्या काही दिवसांत आयात शुल्कात १०० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे व निर्यातीसाठी प्रोत्साहनाचे धोरण आखण्याचा सरकार निर्णय घेईल, असे आश्वासन दिले आहे. गेल्या तीन महिन्यांत साखरेचे दर प्रतिक्विंटल ६०० रुपयांपेक्षा अधिक घसरले असून, कारखान्यांची अवस्था अत्यंत अडचणीची बनली आहे. या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी आम्ही सरकारला विनंती केली आहे. त्यावर सरकारने ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. पाकिस्तानची साखर भारतात  दरम्यान विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार विरोधकांकडून पाकिस्तानची साखर आयात केली गेली, असे आरोप आजवर होत होते. मात्र प्रजाससत्ताक दिनाच्या तयारीसाठी वाघा सीमेवर तयारी सुरू असतानाच पाकिस्तानातून १८०० टन साखर भारतात वाघा सीमेमार्गे पोचली असल्याची माहिती आहे. या वृत्ताचा परिणाम येत्या काही दिवसांत होण्याची व त्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता असून, देशातील साखर उद्योग अगोदरच अडचणीत असताना स्वस्त साखर बाहेरून, त्यातही पाकिस्तानसारख्या देशातून येत असल्याच्या बातमीने सरकारी कार्यालयेही अस्वस्थ झाली आहेत. बहुधा त्यामुळेही साखरेच्या आयातीवर आज असलेले ५० टक्के आयातशुल्क १०० टक्क्यांवर नेण्याची साखर उद्योगातून होत असलेली मागणी शिरोधार्य मानण्याची तयारी केंद्र पातळीवर सुरू झाली असावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com