दर घसरल्याने कोल्हापुरात उत्पादकांकडून कांदा सौदे बंद 

दर घसरल्याने कोल्हापुरात उत्पादकांकडून कांदा सौदे बंद
दर घसरल्याने कोल्हापुरात उत्पादकांकडून कांदा सौदे बंद

कोल्हापूर : येथील बाजार समितीत सौदे सुरू असताना कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. १७) कांदा सौदे बंद पाडले. जोपर्यंत दर वाढणार नाहीत, तोपर्यंत सौदे सुरू करू देणार नाही, अशी भूमिका घेत बाजार समिती प्रशासनासमोर ठाण मांडले. बाजार समितीच्या मध्यस्तीनंतर दुपारी दोननंतर सौदे पूर्ववत सुरू झाले.

सध्या राज्यात कांद्याचे दर घसरत आहेत. कोल्हापूर बाजार समितीत राज्यातील इतर बाजारपेठांपेक्षा क्विंटलला शंभर ते दोनशे रुपयांनी नेहमीच दर जास्त असतात. पण शनिवारी दर ७०० रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. दर कमी मिळत असल्याचे लक्षात येताच उत्पादकांनी सौदे बंद करा, असे म्हणत सौदे बंद केले. जोपर्यंत चांगला दर मिळणार नाही तोपर्यंत सौदे सुरू करू देणार नाही, अशी भूमिका घेतली. दुपारी दोन तास गोंधळ सुरू होता. बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील व सचिव मोहन सालपे यांनी दर वाढवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी सौदे सुरू करण्यास संमती दिली. दुपारनंतर निघालेल्या सौद्यात कांद्यास क्विंटलला दोनशे ते तीनशे रुपये वाढवून दर मिळाल्याचे बाजार समितीच्या प्रशासनाने सांगितले.

श्रीगोंदा, इंदापूर , लोणंद, अहमदनगर, सातारा, बार्शी आदी भागांतून कांदा बाजार समितीत येतो. गेल्या तीन दिवसांपासून कांद्याच्या आवकेत वीस ते पंचवीस टक्क्‍यांनी वाढ झाली आहे. यामुळे दरही कमी होत आहेत. इतर बाजार समित्यांतही दर घसरल्याने कोल्हापुरातही कांद्याची वाढ झाली.

दर घसरणीबाबत शेतकऱ्यांनी जाब विचारताच कांदा साठवणुकीची अडचण आहे, तसेच परराज्यांतील कांद्याला भाव कमी असल्याने जास्त भाव देऊ शकत नाही, असे काही व्यापारी अडते सांगू लागले. तेव्हा जोरदार वाद सुरू झाला. अखेर बाजार समिती प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर सौदे सुरू झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com