बिद्री, जि. कोल्हापूर ः येथील दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक दराची परंपरा कायम राखत यंदा विनाकपात प्रतिटन ३१०० रुपये पहिली उचल देण्याचे जाहीर केले.
याबाबतची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली. कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, की प्रशासकीय कारकिर्दीत केवळ ४ लाख ५१ हजार टन उसाचे गाळप झाले. १२.५९ टक्के सरासरी उतारा मिळाला होता.
चालू हंगामासाठी तोडणी-वाहतूक खर्च वजा जाता प्रतिटन २८६९ रुपये एफआरपी होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तोडग्यानुसार एफआरपी अधिक १०० रुपये असे २९६९ रुपये व दोन महिन्यांनंतर १०० रुपये असे ३०६९ रुपये द्यावे लागणार होते.
यंदा उसाचा उतारा काही प्रमाणात वाढेल; मात्र साखरेचे दर २०० ते ३०० रुपयाने कमी होण्याची भीती आहे.असे जरी असले तरी कारखाना कार्यक्षमपणे चालवून जास्तीत जास्त ऊस गाळप व वीज उत्पादन करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे, असे त्यांनी नमूद केले.