नगरमधील २० हजार शेतकऱ्यांकडून ठिबकसाठी अर्ज

ठिबक सिंचन अनुदान
ठिबक सिंचन अनुदान
नगर  ः दुष्काळात पाणीटंचाईच्या गंभीर झळा सोसल्याने शेतकऱ्यांनाही आता पाण्याचे महत्त्व पटू लागले आहे. कमी पाण्यात पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असून ठिबक, तुषार सिंचनाच्या वापराला प्राधान्य दिले जात आहे. यावर्षी नगर जिल्ह्यातील सुमारे २०,२३१ शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन संच बसवण्यासाठी अनुदान मिळावे म्हणून अर्ज केले आहेत. त्यातील ८४८८ शेतकऱ्यांना कृषी विभागाने पूर्वसंमती दिलेली असून, ३२५४ शेतकऱ्यांना सात कोटींचे अनुदान ही वाटप केले आहे. 
जिल्ह्यात सहा वर्षांपासून एकूण ६३००४.१८ हेक्‍टर क्षेत्रावर ठिबक सिंचनचा वापर केला जात आहे. अनुदानापोटी ९४ हजार ६९१ शेतकऱ्यांना २०२ कोटी ८९ लाख ५६ हजार रुपयाचे वितरण केले आहे. दोन वर्षे सोडली तर मागील पाच-सहा वर्षे जिल्ह्यात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ होता. एखाद्या तालुक्‍याचा अपवाद वगळला तर सगळ्याच तालुक्‍यांनी पाणीटंचाईच्या गंभीर झळा सोसल्या आहेत. त्याचा शेती उत्पादनावर सर्वाधिक परिणाम झालेला आहे.
मात्र अशा स्थितीतही शेततळे आणि ठिबक व तुषार सिंचनाचा वापर केलेले शेतकरी यशस्वी झाल्याचे पाहणीत आढळून आले आहे. पाण्याचा योग्य पद्धतीने वापर व्हावा, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. ठिबक वापरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार अनुदानही देत आहे. ऊसाच्या पिकाला सर्वाधिक पाणी लागते. त्यामुळे ऊस पिकासाठी शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर करावा म्हणून साखर कारखान्यांनी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही कारखान्यांनी ठिबकचा वापर सक्तीचा केला आहे. फुलशेती, भाजीपाला व अन्य पिकांसाठीही आता ठिबक, तुषार सिंचनाचा वापर वाढला असल्याचे सांगितले जात आहे. 
यावर्षी २० हजार शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन करण्यासाठी अनुदान मिळावे म्हणून ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यातील ८४८८ शेतकऱ्यांना ठिबक सिंचन बसवण्यासाठी पूर्वसंमती दिलेली असून ३२५४ शेतकऱ्यांना सात कोटी ९ लाख ३० हजार रुपयाचे अनुदान दिले आहे. दोन हजार दहा हेक्‍टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे.
या वर्षीचे तालुकानिहाय मागणी अर्ज 
नगर ः ६९८, अकोले ः ८०४, कर्जत ः १०३०, कोपरगाव ः ११००, नेवासा ः ४२३९, पारनेर ः ९९२, पाथर्डी ः १३७०, राहाता ः २०५७, राहुरी ः १३१२, संगमनेर ः १४०८, शेवगाव ः ११५७, श्रीगोंदा ः १८८७, श्रीरामपूर ः १६९५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com