नाशिकमधील कांदा, टोमॅटोला मागणी वाढली

देशभरातील मागणीच्या तुलनेत कांदा व टोमॅटो या शेतमालाची आवक कमी झाली आहे. अजून महिनाभर तरी ही स्थिती बदलेल असे दिसत नाही. या परिस्थितीत सध्याचे दर येत्या काळात टिकून राहतील. - अरुण काळे, सचिव, नाशिक बाजार समिती.
कांदा
कांदा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कांदा व टोमॅटो या महत्त्वाच्या शेतमालाला परराज्यांतून मागणी वाढली आहे. गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांतून रोज सरासरी १ लाख क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला २२०० ते २७०० असा दर मिळाला.  नाशिक भागातील टोमॅटो हंगामाने चांगला जोर धरला आहे. यंदा टोमॅटोची आवक निम्म्याने घटली आहे. या स्थितीत कर्नाटक, बिहार, दिल्ली या राज्यांतून मागणी वाढली आहे. गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यात बाजार समिती तसेच शिवार बाजारात दिवसाला १ लाख ५० हजार क्रेटची आवक झाली. प्रति २० किलो वजनाच्या क्रेटला ४०० ते ८०० व सरासरी ६०० रुपये दर मिळाले. हे दर येत्या सप्ताहात टिकून राहतील असे जाणकारांनी सांगितले. गत सप्ताहात लासलगाव, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटलला २२०० ते २७०० व सरासरी २५०० रुपये दर मिळाले. नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांत दराची हीच स्थिती होती. येत्या सप्ताहात हे दर टिकून राहतील असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. शेतकऱ्यांनी साठवलेला उन्हाळ कांदा संपत आला आहे, तर लाल कांद्याची आवक वाढली आहे. यामुळे लाल कांद्याला भावही चांगला मिळत आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांदा आणि गावठी (उन्हाळ) कांद्यांची रोज १५ ते १६ हजार क्विंटल आवक होत आहे. कांद्याला सरासरी २२०० ते २७०० रुपये दर मिळत आहे. गत सप्ताहापासून लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची ३१ हजार ५९७ क्विंटल आणि लाल कांद्याची १३५३२ क्विंटल इतकी आवक होत आहे. येत्या काही दिवसांत ही आवक वाढेल. नोव्हेंबर अखेरपर्यंत उन्हाळ कांदा संपल्याने लाल कांदाच मार्केटमध्ये उपलब्ध राहील. त्यामुळे आता येत्या काळात व्यापाऱ्यांची मदार फक्त लाल कांद्यावर राहील, असेही सूत्रांनी सांगितले. गेल्या महिन्यात परतीचा पाऊस झाल्याने काही ठिकाणी शेतात लाल कांद्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी लाल कांद्याच्या उत्पादनात घट होईल, अशी शक्यता असल्याने कांद्याची आवक कमी राहील. मे, जूनमध्ये उन्हाळ कांदे निघेपर्यंत ही परिस्थिती रा‌हील, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या उन्हाळ आणि लाल कांद्याची आवक रोज १५ ते १६ हजार क्विंटल होत आहे. सरासरी भाव २१०० ते २५००च्या दरम्यान मिळत असल्याने शेतकरीही समाधानी आहे. पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला चांगली मागणी असून, बाजारभावही तेजीत आहे. बाजार समिती आवारात होत असलेल्या आवकेपैकी जुना गावठी कांदा ७० टक्के, तर लाल कांद्याची ३० टक्के आवक होत आहे. पिंपळगाव बाजार समितीत शनिवारी १० हजार १२५ क्विंटल आवक होऊन लाल कांद्याला सरासरी २५०० रुपये, तर उन्हाळ कांद्याला सरासरी २२५१ रुपये दर मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com