नगरमधील ४५ हजार शेतकऱ्यांनी केली कांदाचाळीची मागणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नगर जिल्ह्यात ८० हजार ८४६ लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील तब्बल ४५ हजार ५५१ अर्ज केवळ कांदा चाळ आणि कांदा प्रक्रिया उद्योगाचा लाभ मिळावा यासाठी आहेत. कांदाचाळीच्या मागणीसाठी एवढ्या प्रमाणात अर्ज येण्याची आतापर्यतची ही पहिलीच वेळ आहे.

नगर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून कांद्याचे क्षेत्र वाढत आहे. कांद्याच्या दरात सातत्याने चढउतार होत असताना व सहा महिन्यापासून दरात वाढ होत नसली तरी अजूनही शेतकऱ्यांचा ओढा कांदा पिकाकडेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षभरात कांदा क्षेत्रात दुप्पट वाढ झाली, मात्र दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे. अनेक शेतकऱ्यांकडे कांदा साठवणीसाठी सुविधा नाही, त्यामुळे तात्पुरती पर्यायी व्यवस्था केली असली, तरी कायमची सोय करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत कांदाचाळीचा लाभ मिळतो. पन्नास टक्के अनुदानानुसार १७ हजार ५०० रुपयांचे अनुदान कांदाचाळ बांधण्यासाठी मिळते. त्यामुळे यंदा अन्य योजनांपेक्षा कांदाचाळीचा लाभ मिळावा यासाठीच अर्ज करण्यावर भर दिला आहे.

कृषी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत ८० हजार ८४६ अर्ज आलेले असून, त्यात सर्वाधिक अर्ज कांदा चाळ व प्रक्रिया उद्योगासाठी आले आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी सांगितले.  

तालुकानिहाय कांदा चाळीसाठी अर्ज

कर्जत ७६०९
नेवासा ६९०७
श्रीगोंदा  ४३९७
शेवगाव ५३२७
पाथर्डी  ३४३९
संगमनेर  २३७२
जामखेड ३७१४
पारनेर २५५०
नगर २१६१
अकोले १२११
कोपरगाव १६४२
श्रीरामपूर १७०७
राहाता  ११३७
राहुरी  १३७८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com