कांद्याच्या उभ्या पिकात चरण्यासाठी सोडल्या मेंढ्या 

दोन एकर कांदा पिकासाठी आजपर्यंत ५५ हजार रुपये खर्च केला. महाराष्ट्र बॅंकेचे कर्ज आहे. कांद्याला भाव नाही. कूपनलिकेचे पाणी गेले. उत्पादन खर्च निघणार नाही. त्यामुळे मेंढ्या सोडून पीक नष्ट केले. - सुरेश कारले, शेतकरी, वळण, जि. नगर
कांदा पिकात सोडल्या मेंढ्या
कांदा पिकात सोडल्या मेंढ्या

राहुरी, जि. नगर  : कूपनलिकेचे पाणी अचानक गायब झाले. धरणाचे आवर्तन मिळणार नाही. कांद्याला बाजारभाव नाही. भविष्यात कांद्याला चांगले दर मिळण्याचा भरवसा नाही. अशा दुष्टचक्रात सापडलेले वळण (ता. राहुरी) येथील शेतकरी सुरेश कारले यांनी त्यांच्या कांद्याच्या उभ्या शेतात मेंढ्या सोडून दोन एकरांवरील कांदा पीक नष्ट केले. 

शेतीमालाला अपेक्षित भाव नाही, त्यात दुष्काळाचा तडाखा शेतकऱ्यांची आर्थिक गणिते बिघडवू लागला आहे. मुळा धरणाच्या डाव्या कालव्याखाली सुरेश कारले यांची शेती आहे. यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. तरी जायकवाडीला पाणी गेले. त्यामुळे सिंचनाचे एक उन्हाळी आवर्तन कमी झाले. दोन महिन्यांपूर्वी डाव्या कालव्याचे शेवटचे आवर्तन संपले. मागील वर्षी कालव्याच्या आवर्तनातून मिळणाऱ्या पाझरामुळे मे महिन्यापर्यंत टिकलेले कूपनलिकेचे पाणी यंदा जानेवारी महिन्यातच गायब झाले. साखर कारखान्याला ऊस तुटून गेला. परंतु, पाण्याअभावी खोडवे राखले नाहीत. उसाच्या रानात नांगर फिरविला. 

१० नोव्हेंबर २०१८ रोजी दोन एकरांवर कांद्याची रोपे लावली. त्यासाठी २० हजार रुपयांची रोपे, पंधरा हजार रुपये लागवड खर्च, दहा हजार रुपयांची खते, दहा हजार रुपये खुरपणी असा ५५ हजार रुपये खर्च केला. परंतु, कांद्याला पाचशे ते सहाशे रुपये क्विंटल भाव आहे. भविष्यात कांद्याला चांगले दर मिळतील अशी आशा नाही. जानेवारीतच दुष्काळाची चाहूल लागली. अशा संकटात कारले यांनी उभ्या कांदा पिकात मेंढ्या चरण्यासाठी सोडण्याचा निर्णय घेतला. तालुक्‍यात पाणीप्रश्न गंभीर बनू लागल्याने, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com