चांगल्या सवयीचे गुलाम व्हा

चांगल्या सवयीचे गुलाम व्हा
चांगल्या सवयीचे गुलाम व्हा

मित्रांनो, तुमच्या मनाची शक्ती वापरून तुम्ही काहीही करू शकता हे तर आपण पाहिले आहेच. पण इथं असा प्रश्न उभा राहतो, की या सुप्त मनातील ताकदीचा वापर कसा करायचा? जी ताकद आपल्याला दिसत नाही, त्या ताकदीपर्यंत पोचायचं कसं? याचं उत्तर तसं सोपं आहे. तुमचाच एक जिवाभावाचा मित्र आहे, जो तुम्हाला या ताकदीचा वापर कसा करायचा हे शिकवेल. हा मित्र सतत तुमच्या सोबत असतो. तो तुम्हाला यशापर्यंत अथवा अपयशापर्यंत घेऊन जातो. तो नेहमीच तुमच्याच मर्जीप्रमाणे वागत असतो. याची मैत्री तुम्ही सहजपणे सांभाळू शकता. महत्त्वाचं म्हणजे, तुम्हाला नेमकं काय पाहिजे हे तुम्ही तुमच्या दोस्ताला सांगितलं तर जिवाचं रान करून ती गोष्ट तुमच्यासाठी शंभर टक्के करून दाखवतो. प्रत्येक मनुष्यप्राणी या दोस्ताचा गुलाम आहे. या दोस्ताची तुम्ही चांगली काळजी घेतली, तर या जगातील सर्व प्रकारचे यश तुमच्या पायी लोळण घालेल. पण त्याचा अनादर केला की तो तुम्हाला बरबाद करून टाकायला मागेपुढे बघत नाही. या दोस्ताचं नाव आहे ‘सवय’. तुम्हाला तुमच्या सवयींतून नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा मिळत असते. हीच ऊर्जा तुम्हाला घडवते किंवा बिघडवते. याचं कारण, आपण पहिले सवय लावून घेतो व नंतर त्या सवयीचे गुलाम होतो. कोणतीही सवय मोडणं एवढं सोप्प नसतं, कारण कोणतीही सवय (वाईट किंवा चांगली) कडीला कडी जोडत जाऊन कधी एक मोठ्ठी, न तुटणारी साखळी तयार होते हे कळतच नाही. तेव्हा या `सवय` नावाच्या दोस्ताची जवळीक करताना जरा जपून. नवीन बदल हा फक्त जुन्या सवयींवर रचला जातो. पण वातावरण किंवा परिस्थिती, मनुष्यापेक्षा खूप श्रेष्ठ असते. म्हणूनच जुन्या वातावरणात गेले की तुमचा जुना दोस्त वाटच बघत असतो व तुम्ही जुन्या सवयीत नकळत घुसून जाता.  कोणतीही गोष्ट तुम्ही पहिले पाहता, नंतर त्याप्रमाणे कृती करता. जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही नेहमी, सतत्याने करता त्या वेळी तुम्हाला त्याची सवय लागते. उदा : दरमहा किंवा मिळालेल्या प्रत्येक कमाईचे १० टक्के रक्कम बाजूला काढून ती गुंतवणूक करणे, ही चांगली सवय. पण समजा, तुमच्या आजोबांनी तुम्हाला हे सांगितले असेल, की पैशामुळेच सर्व समस्या निर्माण होतात त्यामुळे पैसा खर्च केलेला बरा, तर तुम्ही अशा दोस्ताला जवळ करता, जो तुम्हाला पैसा खर्च करायला भाग पाडेल. हा सवय नावाचा दोस्त तुम्हाला जे सांगेल, त्याचप्रमाणे सर्वजण कार्य करत असतात. म्हणूनच चांगल्या सवयीशी दोस्ती करायची असेल तर खालील चार गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे आहे.

  •  तुम्हाला कोणी बदलू शकत नाही 
  •  तसेच तुम्ही कोणालाही बदलू शकत नाही. 
  •  कोणतीही सवय पूर्णपणे नष्ट होत नाही. 
  •  चांगल्या सवयींशी दोस्ती टिकवायची असेल तर सातत्य आवश्यक असते. 
  •  एकदा वाईट सवयीशी दोस्ती तुटली, की त्या वातावरणापासून लांब राहा.
  • निसर्गामधून शिकण्यासारखं खूप आहे. कोणतीही मोठी नदी जवळून पाहा. पाऊस पडल्यावर प्रथम लहान झरे, नंतर छोटे-मोठे ओढे, नाले अस एकत्रीकरण सर्व बाजूंनी होत असते. असंख्य ठिकाणचे ओढे एकत्र येऊन एक छोटी नदी होते. २-३ नद्या एकत्र होऊन एक मोठी नदी होते.  आता इथं समजून घ्या, की तुमचा चांगला दोस्त म्हणजे - प्रत्येक कामाईमधून १० टक्के बाहेर काढून गुंतवणे. अशा अनेक १० टक्क्यांमधून होणारी मोठी रक्कम म्हणजे नदी. या रकमेची गुंतवणूक केल्यामुळे होणारी नियमित कामाई म्हणजे वाहता पैसा. तेव्हा या चांगल्या दोस्ताकडून १० टक्के बचतीची सवय लावून घेतली, तर आयुष्यात किती बदल घडतील हे तर तुम्ही पहिलेच. विचार करा; जर आयुष्यातल्या प्रत्येक सवयीचे बरकाईने निरीक्षण करून त्यात सकारात्मक विचार घडवला, तर श्रीमंतीच्या दिशेने तुमची वाटचाल निश्‍चितपणे हेईल. चला तर मग, चांगल्या सवयीचे गुलाम होऊया.  (लेखक ‘फायनान्शिअल फिटनेस` या फर्मचे संचालक आहेत.)   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com