ढाकणी पाणी भरणा केंद्र अत्यवस्थ

ढाकणी पाणी भरणा केंद्र अत्यवस्थ
ढाकणी पाणी भरणा केंद्र अत्यवस्थ

दहिवडी, जि. सातारा : दुष्काळाची दाहकता गंभीर रूप धारण करत असतानाच पाणी भरणा केंद्र अडचणींच्या विळख्यात सापडले आहे. पाण्याची मागणी वाढत असताना पाण्याची उपलब्‍धता कमी होऊ लागल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे. 

माणमध्ये विविध पाणी भरणा केंद्रांमधून टॅंकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जातो; पण अनेकदा ही भरणा केंद्रांत विविध अडचणी येत आहेत. कधी पाणी कमी आहे, कधी वीजपुरवठा सुरळीत नाही, कधी पाइप फुटली, कधी केबल जळाली अशा अनेक समस्यांचा ससेमिरा या केंद्रांच्या मागे लागलेला असतो. 

ढाकणी तलावातील विहिरीतून दररोज ४९ टॅंकरच्या साहाय्याने साधारण ८० खेपा केल्या जातात. त्यातील निम्म्या खेपा या २४ हजार लिटर क्षमतेच्या टॅंकरने, तर उर्वरित निम्म्या खेपा या १२ ते १४ हजार लिटर क्षमतेच्या टॅंकरने केल्या जातात. या माध्यमातून दररोज तब्बल १५ लाख लिटर पाणीपुरवठा विविध ठिकाणी केला जातो. 

पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून येथे म्हसवड विभागातील ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका ग्रामसेवकाला दोन दिवस नेमण्यात येते. पाणी भरणा करण्यासाठी विहिरीवर चार मोटारी (वीजपंप) बसविण्यात आले आहेत; पण आता येथील पाणी पातळी खालावली आहे. अनेकदा येथील केबल जळतात, तर ट्रान्स्फॉर्मरमधील फ्युजा उडण्याचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे तेथे भेट दिली असता पहाटे चार वाजता आलेल्या टॅंकरला दुपारी अडीचपर्यंत पाणी भरण्यासाठी नंबर आलेला नव्हता. 

साधारणपणे २५ टॅंकर पाणी भरण्यासाठी प्रतीक्षा करत उभे होते. अधिक माहिती घेतली असता, केबल जळाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे टॅंकर चालकांनी सांगितले. तसेच, ग्रामसेवकाने स्वतःच्या पैशातून केबल विकत आणून जोडल्यामुळे मोटारी सुरू करण्यात यश आले होते. अन्यथा किती वेळ लागला असता हे सांगता येत नाही. 

रात्रीस चाले वीज अन्‌ पाणी चोरीचा खेळ!  एवढी भीषण दुष्काळी परिस्थिती असताना पिण्यास पाणी नसताना या परिसरातील काही शेतकरी वीज व पाण्याची चोरी करत आहेत. अनेकदा आकडा टाकून वीजचोरी केल्यामुळे लोड येऊन फ्यूज जळतात व वीजपुरवठा खंडित होतो. रात्रीच्या सुमारास हा चोरीचा खेळ सुरू असतो व पहाटे सर्व केबल व मोटारी काढून नेल्या जातात. या वीज व पाणी चोरांवर कठोर कारवाई करून हा चोरीचा खेळ बंद करण्याची आवश्‍यकता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com