धर्मा पाटील मृत्यू प्रकरणाची चौकशी मुख्य सचिवांकडे

धर्मा पाटील मृत्यू प्रकरणाची चौकशी मुख्य सचिवांकडे
धर्मा पाटील मृत्यू प्रकरणाची चौकशी मुख्य सचिवांकडे

मुंबई : वयोवृद्ध प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राज्य सरकार एका महिन्याच्या आत पाटील यांच्या जमिनीचा योग्य मोबदला व्याजासह दिला जाईल, असे लेखी आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले असले, तरी या गंभीर घटनेने फडणवीस सरकार यामुळे हादरले आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतदेखील याचे पडसाद उमटले. सरकारवर हे प्रकरण शेकणार, असे दिसत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना चौकशी करण्याचे आदेश दिले आणि पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत चौकशी अहवाल देण्याच्या सूचना केल्या. सरकारकडून आपल्याला जमिनीचा योग्य मोबदला मिळालेला नाही आणि तो मिळावा म्हणून धर्मा पाटील हे गेली अनेक वर्षे मंत्रालयाच्या फेऱ्या मारत होते. अखेर न्याय मिळत नसल्यामुळे त्यांनी मंत्रालयातच विषप्राशन करून आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. मृत्यूशी झुंज देणाऱ्या पाटील यांचे रविवारी निधन झाले. यानंतर विरोधी पक्षांसह शिवसेनेने भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आधीच शेतकरी कर्जमाफी योजनेतील अनेक त्रुटींमुळे वादग्रत ठरलेल्या भाजप सरकारवर पाटील यांच्या मृत्यूमुळे मोठा ठपका बसला आहे. या घटनेमुळे सोशल मीडीयावर आणि लोकांमध्ये सरकारविरोधी संतापाची लाट उमटली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी धर्मा पाटील यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्यास टाळाटाळ केली. शेजारच्या जमीनमालकांना बाजारभावाने मोबदला; मात्र तोच भाव पाटील यांना देण्यास अधिकाऱ्यांनी हात आखडते घेतले होते, असे वास्तव समोर आले आहे. या प्रकरणी कुठलाही अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यास मागे पुढे पाहिले जाणार नाही, असे स्पष्ट संकेत या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

शिवसेना-भाजपमध्ये वार-पलटवार... दरम्यान, शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूचे पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले. शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी आधीच्या सरकारने शेण खाल्ले म्हणून लोकांनी आपल्याला सत्तेत बसवले; मात्र साडेतीन वर्षे झाली तरी सरकारने धर्मा पाटील यांचा प्रश्न का सोडवला नाही, असा संतप्त सवाल मंत्रिमंडळ बैठकीत केला. याच मुद्यावर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातूनही सरकारवर कोरडे ओढले आहेत. धर्मा पाटील यांच्या चितेची आग सरकारच्या खुर्च्या जाळेल, अशी कठोर टीका अग्रलेखात करण्यात आली आहे. यावरून सेनेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहेत. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तुमच्या खुर्च्या अग्निरोधक नाहीत, त्यामुळे या आगीत तुमच्या खुर्च्याही खाक होतील, असा पलटवार केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com