जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
ताज्या घडामोडी
आटपाडी, जि. सांगली ः दोन वर्षापासनं पाऊस न्हाय...चारा न्हाय....प्यायला पाणी न्हाय....शेतात पेरल्यालं उगवलं न्हाय... पीकविमा मिळाला न्हाय...कर्ज फेडायला पैका न्हाय....हाताला काम नसल्यानं गावातील लोकं गाव सोडून चालल्याती बघा असं गाऱ्हाणं आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडे मांडले.
आटपाडी, जि. सांगली ः दोन वर्षापासनं पाऊस न्हाय...चारा न्हाय....प्यायला पाणी न्हाय....शेतात पेरल्यालं उगवलं न्हाय... पीकविमा मिळाला न्हाय...कर्ज फेडायला पैका न्हाय....हाताला काम नसल्यानं गावातील लोकं गाव सोडून चालल्याती बघा असं गाऱ्हाणं आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडे मांडले.
आटपाडी (जि. सांगली) येथे गुरुवारी (ता. ६) दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक सकाळी ११ च्या सुमारास पात्रेवाढी येथे आले. या वेळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, महसूलचे उपायुक्त प्रताप जाधव, कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रतापसिंह, निवासी जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, कृषी अधीक्षक अधिकारी राजेंद्र साबळे यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या पथकामध्ये निती आयोगाचे सहसंचालक सुभाषचंद्र मीना, एम. जी. टेंभुर्णे, चाऱ्याचे विशेष तज्ज्ञ विजय ठाकरे यांनी तालुक्यातील पात्रेवाडी, लेंगरेवाडी, मानेवाडी, माडगुळे, मुढेवाडी आणि निंबवडे या गावातील जळालेले पीक, कोरड्या विहिरींची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार असल्याने प्रत्येक गावातील शेतकरी केंद्राच्या पथकाची वाट पाहत होते. पथक आल्यानंतर शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या.
‘यंदा पाऊस नाही. त्यामुळे पेरलंल उगवलंच नाय. त्यामुळं जित्राबाला चारा मिळत न्हाय. डाळिंबाला २००० रुपयांपासून ३५०० रुपयांपर्यंत विकत पाणी आणून घालतूया. शेतीला आणि प्यायलाच पाणी मिळना, मग जित्राबाला कुठंन आणायचं. आमच्यावर गाव सोडण्याची वेळ आल्या. मेंढपाळ गाव सोडून गेल्यात आणि ऊसतोडणीसाठी स्थलांतर वाढाया लागलंय. कर्ज वाढू लागलंय. कर्ज फेडायला पैका न्हाय. जित्राबांना ३० ते ४० किलोमीटरवरून विकत आणतोय. चारा संपलाय. जनावरं विकण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही, अशी व्यथा मांडली.’
दरम्यान, शेतकऱ्यांची व्यथा केंद्रीय पथकाने ऐकून घेतली. तसेच पाहणीच्या ठिकाणी केंद्रीय पथकाने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. दुपारी अडीच वाजता येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा जिल्हा प्रशासनाने पथकासमोर सांगितला.
कसला पीक इमा अन् कसलं काय?
केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांना पीकविम्याबाबत शेतकऱ्यांकडे विचारणा केली या प्रश्नाला शेतकरी उत्तर देताना म्हणाले, ‘‘कसला पीक इमा अन् कसंल काय... पैक भरलं पण नुकसान झाल्याचं मोबदलाच न्हाय. कर्ज फेडायचं कसं.’’
- 1 of 348
- ››