agriculture news in Marathi, different rain in places, Maharashtra | Agrowon

शिवाराशिवारांत झाला येगयेगळा पाऊस
माणिक रासवे
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

हिंगोली ः दरवर्षी एक एका मोठ्या शेतकऱ्याले ट्रॅक्टरची ट्राली भरून सोयाबीन होत असते. यंदा चार- पाच शेतकऱ्यांच्या २० एकरांतील सोयाबीनचा माल एकाच ट्रॅालीमध्ये घरी आणला, अशा शब्दांत यंदा जिल्ह्यात सोयाबीनच्या उत्पादनात झालेल्या घटीबाबत चोंढी बुद्रुक (ता. सेनगाव) येथील शेतकरी सखाराम भाकरे यांनी सांगितले.

हिंगोली ः दरवर्षी एक एका मोठ्या शेतकऱ्याले ट्रॅक्टरची ट्राली भरून सोयाबीन होत असते. यंदा चार- पाच शेतकऱ्यांच्या २० एकरांतील सोयाबीनचा माल एकाच ट्रॅालीमध्ये घरी आणला, अशा शब्दांत यंदा जिल्ह्यात सोयाबीनच्या उत्पादनात झालेल्या घटीबाबत चोंढी बुद्रुक (ता. सेनगाव) येथील शेतकरी सखाराम भाकरे यांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यातील विशेषतः हलक्या, बरड, माळरानाच्या जमिनीवर सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांची परिस्थिती भाकरे यांनी सांगितल्याप्रमाणेच आहे. यंदा सोयाबीनच्या उत्पादनातून काढणीसाठीचा मजुरीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. तुरीला नुस्ता पालाच आहे. फुले, शेंगा लागण्याची शक्यता नसल्याने सेनगाव, हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, वसमत तालुक्यांतील शेतशिवारामध्ये नुसत्या झाडण्या उभ्या असल्यासारखी परिस्थिती आहे.

झळा दुष्काळाच्या : अॅग्रोवनची 'अॉन द स्पॉट' मालिका : जिल्हा हिंगोली video

वाढ खुंटलेल्या कपाशीची फुटलेली दोन- चार बोंडांची वेचणी करणे परवडणार नाही. माळरानावरचे गवत सुकून गेले आहे. खरीप ज्वारीचा कडबा अन् दाणे नाहीत. रब्बी ज्वारीची पेरणी शक्य नाही. त्यामुळे अन्नधान्यासोबतच जनावरांच्या चारा-वैरणीची भीषण टंचाई उद्भवणार आहे. नीलगायी, रानडुक्कर, वानर आदी वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी केली जात आहे. रानडुक्कर हल्ला करत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जिवावरचे प्रसंग बेतत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातून उत्पादन घेणे म्हणजे जिवावरच काम झालं आहे, असं शेतकरी सांगत आहेत.

शेतकऱ्याच्या अर्थकारणाला खीळ
खरिपातील सोयाबीन, तुरीनंतर हळद हे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक झाले आहे. परंतु सध्या हळद कंद भरण्याच्या अवस्थेत पाणी कमी पडू लागले आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना देखील भारनियमन, तसेच वारंवार खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे पिकास पाणी देता येत नाही. कमी पाण्यामुळे यंदा हळदीच्या उत्पादनातदेखील मोठी घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे सर्वच तालुक्यांतील शेतकऱ्यांचे अर्थकारण यंदा कोलमडणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.

काय मदत देतात कुणास ठाऊक
भानखेडा येथील वय वर्षे ७२ असलेले ज्येष्ठ शेतकरी बाबूराव मस्के म्हणाले, की पंचमीच्या आधीपासून पाऊस नाही. आभाळ यायचं गरजायचं पण पाऊस झाला नाही. गावागावांच्या शिवाराशिवारांत वेगवेगळा पाऊस पडला. मला कळतंय तशी अशी परिस्थिती आली नव्हती. पालकमंत्री, आमदार आले होते. दुष्काळ, नापिकीच्या पाहणीला. आता काय मदत देतात, काय ठुतात कुणास ठाऊक, येतील वाटतं-वाटतं, उरलं ते उरलं नाही तर आमचं गेलं वाऱ्यानं, परिस्थिती लई वाईट आहे. मेले तिथले बिनघोर झाले, जगणं उपयोगाचं नाही. रोही, रानडुक्कर, वानरं लई ताप देत आहेत.

समदं गाव गेलं ऊसतोडीला
येलदरी धरणाच्या पाळूला लागून वसलेल्या सेनगाव तालुक्यातील लिंबाळा हरिदास चव्हाण हे साठीच्या पुढचे ज्येष्ठ शेतकरी म्हणाले, की गोकुळ अष्टमीच्या आधीपासून पाणी नाही. सोयाबीनच्या पापड्या झाल्या, दाणे बारीक झाले दोन एकरांत ३ कुंटल सोयाबीन झालं. यंदा घरच्याही नाही अन् बटईने केलेल्या शेतात आमदानी झाली नाही. तूर सोडून द्यावी लागणार आहे. चारा वैरण नाही. दरवर्षी दिवाळीपर्यंत हिरवं गवत असतं. पण ते आताच गवत वाळून गेलं आहे. बैल फुकट सांभाळावे लागत आहेत. गावात काम राहिलं नाही. सगळं गाव धुऊन ऊसतोडीसाठी साखर कारखान्याला गेलं आहे. यंदा ४० जोड्या ऊसतोडीला गेल्या आहेत. आम्हीबी ७० हजार रुपये उचल आणली आहे. घरातील समदेच ऊसतोडीला जाणार आहोत.

उसनवारी करून पीकविमा भरला
चोंढी बुद्रुक येथील शेतकरी सखाराम भाकरे म्हणाले, की पावणेपाच एकर शेत आहे. या वर्षी यंदा आधी जास्त पाऊस झाल्याने ओढ्याचे पाणी गेल्याने सोयाबीन वाहून गेले. मनरेगातून घेतलेली विहीर गाळाने भरली. काम अर्धवट आहे. दोन बिले बाकी आहेत. क्वोटेशन भरायला पैसे नाहीत. डिझेलचे भाव वाढल्याने इंजिने पाणी देणे परवडत नाही. पाणी असून उपयोग नाही. शेत कामासाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे पत्नी सुमनबाई आणि मी मिळून शेतातली कामे करत असतो. यंदा सोयाबीनचा उतारा तसेच बाजारभाव कमी आहेत. शेतात कामे राहिली नाहीत. गुरं, ढोरं नसलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी कामासाठी गाव सोडलं, पुणे, मुंबई गाठली. गेल्या वर्षी १ हजार ४०० रुपये पीकविमा भरला होता. पण मिळाला ८०० रुपये. यंदा उसनवारी करून १ हजार ९०० रुपये पीकविमा भरला सोयाबीनचं येवढं नुकसान झालं आहे यंदा. चांगली विमा नुकसानभरपाई मिळायलाच पाहिजे.

सहा मंडलांमध्ये पावसाची तूट मोठी
जिल्ह्यातील ३० पैकी दिग्रस ४८.६ टक्के, खंबाळा ५१ टक्के, गिरगाव ४०.३, टेंभूर्णी ५१.१ टक्के, सेनगाव ५२.४ टक्के, साखरा ४८.८ टक्के या सहा मंडलांमध्ये ४० ते ५३ टक्के पाऊस झाला. जिल्ह्यात आजवर ८७५.८ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे, परंतु प्रत्यक्षात ६८४ मिलिमीटर म्हणजेच ७८.१ टक्के पाऊस झाला. यंदा पावसाची २१.९ टक्के तूट निर्माण झाली. कमी पाऊस, वाढता उपसा यामुळे सप्टेंबर महिन्यातच कळमनुरी, सेनगाव तालुक्यांतील भूजल पातळी पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा अनुक्रमे ०.१२ मीटर आणि ०.४६ मीटरने खोल गेली आहे. लघू तलाव कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे यंदा लवकरच जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील पाणीटंचाई गंभीर रूप धारण करणार आहे.

दोन तालुक्यांना दुष्काळाच्या निकषांचा फटका
दुष्काळाची ट्रिगर २ लागू झालेल्या हिंगोली, कळमनुरी, सेनगाव तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहिर करण्यात आली आहे. परंतु औंढा नागनाथ आणि वसमत या दोन तालुक्यांना वगळण्यात आले. वास्ताविक पहाता औंढा नागनाथ तसेच वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. परंतु दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील निकषांचा फटका या दोन तालुक्यांना बसला आहे. 

प्रतिक्रिया
अजून  जेमतेम एक महिना कस तरी पाणी पुरलं. पाणी नसल्यानं आमच्या गावातील ९० टक्के शेतकरी हरभरा पेरणार नाहीत. रोही (निलगायी) पिकांची नासाडी करतात.
- अनिल गायकवाड, खंडाळा, ता. जि. हिंगोली.

जमिनीत ओलावा नसल्यामुळे रब्बीची पेरणी ठप्प झाली आहे. पाण्याअभावी रब्बी तसेच उन्हाळी ज्वारीचे उत्पादन घेता येणार नाही. कडबा तसेच धान्य मिळाणार नाही.
- नागेश खांडरे, डोंगरकडा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली

हळद पिकांचे कंद भरण्याच्या संवदेनशील अवस्थेत पाण्याची अत्यंत गरज आहे. विहिरीत थोडे पाणी आहे, परंतु खंडित वीजपुरवठा आणि भारनियमनामुळे ते हळदीला देता येत नाही.
- बाळासाहेब राऊत, तेलगाव, ता. वसमत, जि. हिंगोली

दरवर्षीपेक्षा यंदा पावसाळा कमी झाला. पार्डी, गोजेगाव शिवारात माळरानाची जमीन आहे. त्यामुळे ओलावा जास्त काळ टिकून राहत नाही. रब्बीतील पिके घेता येणार नाहीत.
- जनार्धन नागरे, पार्डी, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा सोयाबीनच्या उताऱ्यात निम्म्याहून अधिक घट झाली. पाऊस पडला, वाहून गेला. जमिनीत ओलावा नसल्याने हरभरा पेरता येणार नाही.
- दीपक काळे, हाताळा, ता. सेनगाव, जि. हिंगोली

इतर अॅग्रो विशेष
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...