दिव्‍यांग मतदारांना केंद्रावर मूलभूत सुविधा पुरवाव्यात 

दिव्‍यांग मतदारांना केंद्रावर मूलभूत सुविधा पुरवाव्यात
दिव्‍यांग मतदारांना केंद्रावर मूलभूत सुविधा पुरवाव्यात

पुणे ः मतदान केंद्रावर दिव्‍यांग मतदारांना (पीपल विथ डिसअॅबिलिटी- पीडब्ल्‍यूडी) आवश्‍यक त्‍या मूलभूत सुविधा उपलब्‍ध राहतील, याची खात्री करण्‍याच्‍या सूचना विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी दिल्या. 

पुणे जिल्‍हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्‍या पूर्वतयारीचा आढावा घेताना ते बोलत होते. या वेळी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, जिल्‍हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, उपायुक्‍त संजयसिंह चव्‍हाण, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर यांनी जिल्‍हानिहाय निवडणूक तयारीचा आढावा घेतला. बैठकीत निवडणुकीशी संबंधित सर्व विषयांची माहिती, जिल्‍हा प्रशासनाची तयारी त्‍यांनी जाणून घेतली. ‘एकही मतदार सुटता कामा नये’, हे यंदाच्‍या निवडणुकीचे ब्रीदवाक्‍य असून सर्व पात्र मतदारांबाबत विशेषत: दिव्‍यांग मतदारांबाबत अधिक जागृत राहावे. मतदान केंद्रांवर पिण्‍याचे पाणी, स्‍वच्‍छतागृह, रॅम्‍प, विजेची सोय, दिव्‍यांग मतदारांना मतदान कक्षात जाताना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी आवश्‍यक ती सुविधा उपलब्‍ध राहावी.

निवडणूक काळात दारूचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, याकडे लक्ष वेधून डॉ. म्‍हैसेकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांनी जागरूक राहून कारवाई करावी. भरारी पथकासह इतर पथकांमध्‍ये समन्‍वय ठेवावा. मतदान यंत्र आणि व्‍हीव्‍हीपॅटबाबत पोलिस विभागासह सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्‍ये प्रात्‍यक्षिके दाखवून जनजागृती करावी, शंकानिरसन करावे, अशा सूचना त्‍यांनी दिल्‍या. सी-व्‍हीजील अॅपवर येणाऱ्या तक्रारींबाबत ताबडतोब कार्यवाही करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी आदेश मिळाल्‍यावर कार्यवाही करण्‍यापेक्षा सक्रिय राहून कार्यवाही करावी.

जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या सर्वच विभागांना आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक आहे. आदर्श आचारसंहिता देशभर लागू असून रेल्‍वे, डाक विभाग, कृषी, बँका यांच्‍यासह शासकीय-निमशासकीय संस्‍थांनी आचारसंहितेचे पालन करणे आवश्‍यक आहे. आचारसंहितेचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कार्यवाही होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com