रोगग्रस्त कपाशीचे दुबार पीक नको; कृषी आयुक्तालयाचा सल्ला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : राज्याच्या अनेक भागांत कपाशीवर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोगग्रस्त प्लॉटमध्ये दुसरे पीक (फरदड) घेता उलट आधीचेच अवशेष नष्ट करावेत, असा सल्ला कृषी आयुक्तालयाने दिला आहे.

‘बीजी-२’ या वाणाची लागवड करताना शेंदरी बोंडअळीपासून बचाव होतो असा दावा या तंत्रज्ञानाचा आहे. मात्र, शेंदरी बोंडअळीला प्रतिकारक्षमता या वाणात तयार झाल्याचे दिसून येते. त्यामुळे अळीचा प्रादुर्भाव अनेक भागांत वाढला आहे. अशा रोगग्रस्त भागात आहे त्या झाडांवरील कपाशीची वेचणी करून घ्यावी. त्यानंतर शेतकऱ्यांनी प्लॉटमधील सर्व रोगग्रस्त अवशेष नष्ट करण्याची आवश्यकता आहे, असे राज्याचे कृषी विस्तार संचालक डॉ. एस. एल. जाधव यांनी सांगितले.

राज्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र ४१ लाख हेक्टर असले, तरी यंदा पेरा वाढला आहे. कपाशीचा पेरा मराठवाड्यात वाढल्यामुळे चालू हंगामात ४२ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र कपाशीखाली आले आहे. यात नाशिक विभागात ८.३१ लाख हेक्टर, पुणे १.२५ लाख, औरंगाबाद १०.४७ लाख, लातूर ५.४३ लाख, अमरावती ९.९५ लाख तर नागपुरात ६.६२ लाख हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला आहे.

‘शेतकऱ्यांनी कपाशीच्या प्लॉटचे बारकाईने निरीक्षण करावे. शेंदरी बोंडअळी दिसत असल्यास उपाय करावेत. रोगग्रस्त प्लॉटमधील उत्पादकता घटण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे  पहिला वेचा करून पिकाचे रोगग्रस्त अवशेष नष्ट करावे. कारण, रब्बीचे म्हणजे दुसरे पीक (फरदड) घेण्याचा प्रयत्न झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते, असे डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले.  कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, बीजी-दोन श्रेणीतील वाणावर यंदा जालना, परभणी, नांदेड, जळगाव, बुलडाणा या भागांत शेंदरी बोंडअळीचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. कपाशीचे पीक कोरडवाहू असून, कीडरोग नियंत्रणाचे उपाय वाढल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चदेखील वाढण्याची चिन्हे आहेत.

बीजी-२ हे शेंदरी बोंडअळीला प्रतिकारक्षम वाण असल्याचा दावा करून शेतकऱ्यांकडून जादा पैसे घेतले जातात. या तंत्रज्ञानानाबाबत साशंकता व्यक्त करणारा पत्रव्यवहार राज्य शासनाने केंद्राकडे केलेला आहे. यंदादेखील शेंदरी बोंडअळीविषयक माहिती गोळा करून केंद्राकडे पुन्हा पत्रव्यवहार केला जाऊ शकतो, अशी माहिती मराठवाड्यातील कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

मराठवाड्यात यापूर्वी शेतकऱ्यांना सदोष बियाणे विकल्याबद्दल एका कंपनीच्या वाणावर कृषी खात्याने बंदी घातली होती. तसेच, २२६ शेतकऱ्यांना ३६ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशदेखील कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com