तीन जिल्ह्यांत ८ लाख जमीन आरोग्यपत्रिकांचे वितरण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : कृषी विभागाच्या मृदा आरोग्यपत्रिका वितरण अभियानांतर्गत आजवर नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांमधील २ हजार २८४ गावांतील १ लाख ६० हजार ७४९ माती नमुने संकलित करून परीक्षणानंतर शेतकऱ्यांना ८ लाख ५११ जमीन आरोग्यपत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत.

प्रत्येक क्षेत्राचे माती परीक्षण करून जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेऊन त्यावर आधारित पिकांसाठी खतमात्राची शिफारस करण्यासाठी, तसेच रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर करून एकात्मिक खत व्यवस्थापनातून पिकांच्या उत्पादकतेत वाढ करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत मृदा आरोग्यपत्रिका वितरण अभियानअंतर्गत माती नमुने संकलित करून शेतकऱ्यांना मोफत जमीन आरोग्यपत्रिका वितरण केले जात आहे.

नांदेड जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये १ हजार १३४ गावांतील ५१ हजार ५८७ माती नमुने तपासण्यात आले असून, २ लाख ६७ हजार १४४ शेतकऱ्यांना जमीन आरोग्यपत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. परभणी जिल्ह्यातील ६२९ गावांतील ४१ हजार १९१ माती नमुन्यांची तपासणी करून शेतकऱ्यांना २ लाख ८५ हजार ३०६ जमीन आरोग्यपत्रिका वितरित करण्यात आल्या. हिंगोली जिल्ह्यातील ५२१ गावांतील ३१ हजार ५२० माती नमुन्यांची तपासणी करून शेतकऱ्यांना १ लाख ९८ हजार ५०५ जमीन आरोग्यपत्रिका वितरित करण्यात आल्या.

२०१७-१८ या वर्षात नांदेड जिल्ह्यातील ७५९ गावांतील ५२ हजार ३५२ माती नमुने काढून २ लाख ६१ हजार ७६० जमीन आरोग्यपत्रिका वितरणाचा लक्ष्यांक आहे. परभणी जिल्ह्यांत २६ हजार ३८४ माती नमुने संकलित करण्याचे उद्दिष्ट आहे. आजवर १७ हजार ६२१ माती नमुने संकलित करण्यात आले असून, त्यापैकी ८ हजार ४७८ नमुन्यांची तपासणी करून ३३ हजार ३०४ जमीन आरोग्यपत्रिका तयार करण्यात आल्या.

शेतकऱ्यांना २६ हजार ८५ जमीन आरोग्यपत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील १७ हजार ६०५ माती नमुने संकलित करण्याचे उद्दिष्ट आहे. ८ हजार ९५० नमुन्यांची तपासणी करून ३६ हजार १८२ जमीन आरोग्यपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २३ हजार ४७१ जमीन आरोग्यपत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत तीन जिल्ह्यांतील २ हजार २८४ गावांतील १ लाख ६० हजार ७४९ माती नमुने संकलित करून शेतकऱ्यांना ८ लाख ५११ जमीन आरोग्यपत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत.

माती परीक्षणासाठी अपुरी यंत्रणा नांदेड जिल्ह्यात एक शासकीय माती तपासणी प्रयोगशाळा, तसेच २० खासगी माती परीक्षण संस्था आणि २ कृषी विज्ञान केंद्र यांच्यामार्फत माती परीक्षण केले जाते. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी परभणी येथे शासकीय माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. परभणी येथे १ शासकीय मिनिलॅब, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मृदाशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागातील प्रयोगशाळा, कृषी विज्ञान केंद्र तसेच एक खासगी प्रयोगशाळा आहे. हिंगोली जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्रामध्ये माती परीक्षण केले जाते. परभणी जिल्ह्यात मानव विकास मिशनअंतर्गत कृषी विद्यापीठ तसेच कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडे प्रत्येकी एक फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. परंतु त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नसल्यामुळे थेट गावात जाऊन माती परीक्षण करण्यासाठी मर्यादा येत आहेत. एकूणच तीन जिल्ह्यांत माती परीक्षणासाठी यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com