परभणी जिल्ह्यात १२३१ शेततळी पूर्ण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत आॅक्टोबरअखेर १ हजार २३१ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ३५० शेततळी, तर पाथरी तालुक्यात सर्वांत कमी ५० शेततळी पूर्ण झाली आहेत. एकूण १ हजार १९८ शेततळ्यांची कामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आले असून, या योजनेअंतर्गंत आॅक्टोबरअखेरपर्यंत ५ कोटी ६९ लाख १८ हजार रुपये खर्च झाला आहे. अजून ११ लाख ५० हजार रुपये निधी शिल्लक असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत २०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षाचे मिळून परभणी तालुक्यात ४६३ शेततळी, जिंतूर तालुक्यामध्ये ५९४, सेलू तालुक्यामध्ये ३३३, मानवत तालुक्यामध्ये २००, पाथरी तालुक्यामध्ये ४२५, सोनपेठ तालुक्यामध्ये २५०, गंगाखेड तालुक्यामध्ये ३९०, पालम तालुक्यामध्ये १४५, पूर्णा तालुक्यात २०० शेततळी असे मिळून जिल्ह्यात एकूण ३,००० शेततळ्याची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे; परंतु या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील एकूण ५,१२५ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर केले होते.

त्यापैकी ५,०९२ प्रस्तावांचे सेवा शुल्क भरण्यात आले होते. ५५ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले. पात्र प्रस्तवांपैकी ३,६९३ शेतकऱ्यांच्या शेतातील जागा शेततळ्याचे खोदकाम करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य होत्या.

तालुकानिहाय उद्दिष्टानुसार तालुका स्तरीय समितीने एकूण ३,५८४ शेततळ्यांच्या कामांना मंजुरी देऊन कार्यारंभ आदेश देण्यात आले. १०९ शेतकऱ्यांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली. कार्यारंभ आदेश दिलेल्या शेततळ्यांपैकी २,८७६ शेततळ्यांची आखणी करून देण्यात आली. त्यापैकी १,२३१ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. पाथरी तालुक्यात १० शेततळ्यांची कामे सुरू आहेत. पूर्ण झालेल्या शेततळ्यांमध्ये परभणी तालुक्यात २२३, जिंतूरमध्ये ३५०, सेलूमध्ये ११६, मानवत १६४, पाथरी ५०, सोनपेठ ४०, गंगाखेड १४५, पालम ४३ आणि पूर्णा तालुक्यात १०० अशी एकूण १,२३१ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

२०१६-१७ मध्ये प्राप्त झालेला १ कोटी ५० लाख ६७ हजार रुपये निधी ३०९ शेततळ्यांच्या अनुदानासह अन्य बाबींवर खर्च झाला. २०१७ मध्ये नवीन आर्थिक वर्षामध्ये ४ कोटी २२ लाख रुपये निधी वितरित करण्यात आला. त्यापैकी ८८९ शेततळ्यांच्या कामांवर ४ कोटी ९ लाख २० हजार रुपये आणि कार्यालयीन कामांसाठी मिळून एकूण ४ कोटी १० लाख ५१ हजार ३८० रुपये निधी खर्च झाला. दोन वर्षांत एकूण ५ कोटी ७२ लाख ६८ हजार रुपये निधीपैकी १,१९८ शेततळ्यांच्या कामांवर ५ कोटी ६१ लाख १८ हजार रुपये निधी खर्च झाला असून, अद्याप ११ लाख ५० हजार रुपये निधी शिल्लक असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com