पुणे जिल्ह्यात प्रशासकीय अनास्थेमुळे फळबाग लागवडीला खीळ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : केंद्र शासनाने लादलेल्या जाचक अटी आणि गाव पातळीवर असलेली प्रशासनाची अनास्था, यामुळे केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेच्या फळबाग लागवडीला ग्रहण लागले आहे. पुणे जिल्ह्यात नोव्हेबर अखेरपर्यंत बोटावर मोजण्याएवढी फळबाग लागवड झाली आहे. तरी गावपातळीवरील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या योजनेला खीळ बसल्याचे दिसून येते. अशीच स्थिती कायम राहिल्यास भविष्यात जिल्ह्यातून फळबाग लागवड नष्ट होण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

चालू वर्षापासून जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत फळबाग लागवडीचा निर्णय घेतला आहे. परंतु प्रशासकीय पातळीवरून मजुरीचे देयक, जॉब कार्ड अशा विविध बाबी शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाहीत. तसेच अनेक ठिकाणी ग्रामरोजगार सेवक सहकार्य करत नसल्यामुळे अडचणी येत आहेत. मनरेगाअंतर्गत फळबाग लागवडीसाठी पंधरा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र फळबाग लागवडीसाठी असलेल्या जाचक अटी शेतकऱ्यांना तापदायक ठरत असल्याने शेतकरी फळबाग लागवडीकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

यंदा जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पाच हजार ५९७ हेक्टर लागवडीचा लक्ष्यांक देण्यात आला होता. त्यासाठी जिल्ह्यातील सुमारे चार हजार ४१६ शेतकऱ्यांनी तीन हजार ४८५ हेक्टरसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी चार हजार ३८१ शेतकऱ्यांना तीन हजार ४५८ हेक्टरसाठी तांत्रिक, तर ४०२४ शेतकऱ्यांना तीन हजार १०८.८ हेक्टरसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. तर ८०१ शेतकऱ्यांनी ६७६ हेक्टर क्षेत्रावर खड्डे खोदले आहेत. त्यापैकी ७५४ शेतकऱ्यांनी अवघ्या ६१४ हेक्टरवर लागवड केली असल्याचे स्पष्ट होते.

योजनेअंतर्गत सलग शेतावर अवघे १४२ हेक्टरवर लागवड झाली आहे. तर बांधावरील लागवडीमध्ये ४५२ हेक्टरवर लागवड झाल्याचे दिसून येते. तर १८ हेक्टर पडीक जमिनीवर लागवड झाली आहे. जिल्ह्यात ६१४ हेक्टरवर एकूण ६९ हजार ३६४ रोपांची लागवड झाली असल्याचे कृषी विभागात प्रगती अहवालातून दिसून येते.

यंदा जिल्ह्यात आंब्याची ३१२ हेक्टर लागवड झाली आहे. तर नारळाची १७७ हेक्टरवर लागवड झाली आहे. उर्वरित फळझांडाची अवघी बोटांवर मोजण्याएवढीच लागवड झाली आहे.

फळपीकनिहाय झालेली लागवड (हेक्टरमध्ये ) ः आंबा ३१२.४५, नारळ १७७.८५, सीताफळ ४५.९०, डाळिंब ३७.६५, पेरू ११.५५, लिंबू ९.५०, चिंच ५.३०, शेवगा ३.२०, चिकू ३.१०, बांबू २.९०, औषधी वनस्पती ४.८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com