नांदेड, परभणी, हिंगोलीत 'शेतीमाल तारण'तून ६ कोटींचे कर्जवाटप

तीन जिल्ह्यांत शेतीमाल तारण योजनेतून ६ कोटींचे कर्जवाटप
तीन जिल्ह्यांत शेतीमाल तारण योजनेतून ६ कोटींचे कर्जवाटप

नांदेड ः शेतीमाल तारण योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १६ कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी सोमवार (ता. १०) पर्यंत ६४१ शेतकऱ्यांना ६ कोटी ३३ लाख ५५ हजार ७९५ रुपये कर्ज वाटप केले आहे. या संदर्भात पणन मंडळाच्या सूत्रांनी माहिती दिली.

खुल्या बाजारातील शेतीमालाचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. या परिस्थितीत तातडीच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतीमाल तारण ठेवून कर्ज घेता येते. बाजारभाव वाढल्यानंतर तारण शेतीमालाची विक्री केल्यास फायदा होऊ शकतो. त्या दृष्टीने पणन मंडळातर्फे कृषी उत्पन्न बाजार समित्याअंतर्गत शेतीमाल तारण योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत तारण शेतीमालाच्या चालू बाजारभावानुसार होणाऱ्या किमतीच्या ७५ टक्के कर्ज १८० दिवस कालावधीसाठी ६ टक्के व्याज दराने दिले जाते.

सध्या नांदेड जिल्ह्यातील १९ पैकी ८ कृषी उत्पन्न बाजार समित्या, परभणी जिल्ह्यातील ११ पैकी ४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, हिंगोली जिल्ह्यातील ७ पैकी ३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमाल तारण योजना राबविली जात आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमाल तारण योजनेचा व्यापक प्रचार केला जात आहे. त्यामुळे या योजनेतील शेतकऱ्यांचा सहभाग वाढत आहे. तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होत आहे, असे पणन मंडळाचे जिल्हा प्रतिनिधी पंकज चाटे (परभणी), पृथ्वीराज मानके (नांदेड) यांनी सांगितले.

नांदेडमधून २३ हजार क्विंटल शेतीमाल तारण नांदेड जिल्ह्यातील नांदेड, नायगाव, देगलूर, धर्माबाद, कुंडलवाडी, हदगांव, माहूर, किनवट या आठ कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतीमाल तारण योजनेअंतर्गत सोमवार (ता. ११) पर्यंत ३६५ शेतकऱ्यांना एकूण ३ कोटी ५५ लाख ८० हजार ७०४ रुपये कर्ज वाटप केले आहे. त्यासाठी ७ कोटी १ लाख ८७ हजार २६४ रुपये एवढ्या किमतीचा २३ हजार १२८ क्विंटल शेतीमाल बाजार समित्यांकडे तारण ठेवला आहे, असे पणन मंडळाचे जिल्हा प्रतिनिधी पृथ्वीराज मानके यांनी सांगितले.

परभणीतून ९ हजार क्विंटल शेतीमाल तारण परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी या पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी २२६ शेतकऱ्यांना २ कोटी १३ लाख ४८ हजार १९१ रुपये शेतीमाल तारण कर्ज वाटप केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, हरभरा, हळद मिळून एकूण २ कोटी ८५ लाख १ हजार ८३० रुपये एवढ्या किमतीचा ९ हजार २६४ क्विंटल शेतीमाल तारण ठेवला आहे.

हिंगोलीतून २ हजार ८०२ क्विंटल शेतीमाल तारण हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, जवळा बाजार या तीन कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी एकूण ५० शेतकऱ्यांना ६४ लाख २६ हजार ९०० रुपये एवढे कर्ज वाटप केले आहे. त्यासाठी या शेतकऱ्यांचा हळद, सोयाबीन मिळून एकूण ९३ लाख १८ हजार ७१९ किमतीचा २ हजार ८०२ क्विंटल शेतीमाल तारण ठेवला आहे.

जिल्हानिहाय शेतीमाल तारण कर्ज स्थिती
जिल्हा बाजार समिती संख्या शेतकरी कर्ज रक्कम
नांदेड ३६५ ३,५५,८०,७०४
परभणी २२६ २,१३,४८,१९१
हिंगोली ५० ६४,२६,९००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com