बीटी कापूस बियाण्यांना डीएनए चाचणी सक्तीची

बीटी कापूस बियाण्यांना डीएनए चाचणी सक्तीची
बीटी कापूस बियाण्यांना डीएनए चाचणी सक्तीची

पुणे : बीटी कापूस बियाण्यांच्या विक्रीतील बनवेगिरी रोखण्यासाठी बियाण्यांची अंतर्गत गुणधर्मांची ‘डीएनए’ तपासणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याशिवाय बियाण्यांच्या बाह्यगुणधर्मांची ‘डस’ चाचणीदेखील सक्तीची करण्यात आली आहे.  केंद्र शासनाने बीटी बियाण्याच्या ४५० ग्रॅम पाकिटाची किंमत यंदा ८०० रुपये ऐवजी ७४० रुपये ठेवली आहे. राज्यात बीटी बियाण्यांच्या बाजारपेठेत यंदा ३० कंपन्यांकडून १०० पेक्षा जास्त वाणांची विक्री केली जाण्याची शक्यता आहे. यंदा कितीही अडचणी आल्या तरी राज्यातील शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदीपोटी एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वापरली जाईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.  ‘‘यवतमाळ विषबाधा प्रकरण, गुलाबी बोंड अळीची समस्या, बेकायदेशीर एचटी कपाशी बियाण्यांच्या तपासासाठी नियुक्त केलेली एसआयटी या सर्व घटनाक्रमांमुळे आम्ही यंदाच्या हंगामात बाजारपेठेत येणाऱ्या बियाण्यांवर कडक लक्ष ठेवणार आहोत. त्यासाठीच बियाणे उत्पादक कंपन्यांना ‘डीएनए’ व ‘डस’ अशा दोन चाचण्यांमधून जाण्याची सक्ती करण्यात आली आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  बियाणे कंपन्यांनी मात्र नव्या नियमांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘हंगाम तोंडावर आलेला असताना अचानक नियम लागू करून बियाणे कंपन्यांना त्रास देण्याचा प्रयत्न कृषी खाते करीत आहे,’’ असा दावा मात्र काही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केला आहे. ‘‘गेल्या एक वर्षापासून बीटी बियाण्यांबाबत राज्यभर चर्चा चालू होती. उशिरा जागे झालेल्या कृषी विभागाने गेल्या सहा मार्चला ‘डीएनए’विषयक आदेश जारी केले आहेत. बाजारपेठेत बियाणे उतरविण्याची कंपन्यांची धावपळ असताना मध्येच नियम लागू केल्याने बियाणे उपलब्धतेवर परिणाम होईल,’’ अशी भीती कंपन्यांनी व्यक्त केली आहे.  कृषी विभागाने मात्र बियाणे कंपन्यांचा दावा फेटाळला आहे. ‘‘शेतकऱ्यांच्या हितासाठी नियमावली लागू केली आहे. डस (बियाणे भिन्नता-समानता-स्थिरता गुणधर्म) चाचणी व डीएनए फिंगर प्रिंट (डायरायबो न्युक्लिक अॅसिडचे ठसे) काढल्याचे प्रमाणपत्र आम्ही मागितलेले नाही. केवळ या चाचण्यांसाठी प्रयोगशाळांकडे अर्ज केल्याची पोच पावती जोडली तरी बियाणे विक्रीचा परवाना मिळणार आहे. बनवेगिरी करणाऱ्या कंपन्यांना या चाचण्यांची भीती असून चांगल्या कंपन्या या नियमाला अनुकूल आहेत. काही कंपन्यांनी डीएनए, डस चाचणी प्रक्रियेचे पुरावेदेखील सादर केले आहेत,’’ असे कृषी विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.  डीएनए फिंगरप्रिंट तपासणी सक्तीची केल्यामुळे आता अप्रमाणित बियाणे शेतकऱ्यांच्या गळ्यात मारणाऱ्या कंपन्यांची अडचण झाली आहे. बीटी बियाणे विविध नावाने वेगवेगळ्या किमती लावून विकले जाते. मुळात ते एकच वाण असून त्याचे गुणधर्मही सारखे असतात. डीएनए फिंगरप्रिंटमध्ये ही बनवेगिरी आपोआप उघड होणार आहे.  ‘‘खरीप हंगामात कृषी विभागाला बेकायदा बियाणे आढळल्यानंतर या बियाण्यांची पुन्हा डीएनए फिंगर प्रिंट काढून आम्ही कंपन्यांनी आधी दिलेल्या डीएनए अहवालाशी तुलना करून बघणार आहोत. त्यामुळे कागदपत्रे वेगळी आणि भलतेच बियाणे विकणाऱ्या कंपन्यांना जेरबंद करता येईल. यात राज्याबाहेर कंपन्यांचा जास्त सहभाग असतो,’’ असे कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  कृषी विद्यापीठांकडून निर्णयाचे स्वागत बियाणे उत्पादक कंपन्यांना डीएनए व डस चाचणी सक्तीची केल्यामुळे पहिल्या टप्प्यात कंपन्यांना थोडा त्रास होणार असला तरी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळण्यास मदत होईल. मुळात हा निर्णय काही वर्ष आधीच घेण्याची गरज होती, असे मत कृषी विद्यापीठांमधील पैदासकार व शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. ‘‘कोणत्याही बियाण्यातील डीएनएमध्ये असलेली जनुके त्या बियाण्यांमधील विशिष्ट गुणधर्मांना नियंत्रित करीत असतात. त्यांची ओळख आम्हाला डीएनए चाचणीतून पटते. जनुके आपल्या जागेत बदल किंवा उत्पपरिवर्तित (म्युटंट) होत असली तरी कोणत्याही विशिष्ट वाणात जनुकांची शृंखला बदलत नाही. त्यामुळे कंपनीने दावा केलेले विशिष्ट वाण ते हेच आहे किंवा नाही हे ठामपणे शास्त्रज्ञाला सांगता येते. त्यासाठी प्रयोगशाळेत एक महिन्याचा कालावधी लागतो. डस चाचणीत बियाण्यांचे उगवण ते काढणीपर्यंतचे सर्व बाह्यगुणधर्म तपासावे लागतात. त्यासाठी एक वर्षाचा अवधी जातो,’’ अशी माहिती एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाने दिली. 

सात नियमांची पूर्तता केल्याशिवाय बियाणे परवाना नाही जनुकीय तंत्रज्ञान मान्यता समितीने अर्थात जीईसीने मान्यता दिलेल्या बीटी बियाण्यांच्या मूळ नावासमोर ''ब्रॅंडनेम'' टाकणार नाही या मुख्य अटीवर परवाने दिले जाणार आहेत. त्याशिवाय कंपन्यांना डस गुणधर्म स्वस्वाक्षरीत सादर करावे लागतील. डस चाचणीसाठी विद्यापीठात बियाणे जमा केल्याची पावती, २०१२ पूर्वीच्या संशोधित वाणाचा नमुना विद्यापीठाकडे देतांना त्याच्या कीडरोग प्रतिकारक क्षमता व उत्पदनाशी निगडित माहिती, विद्यापीठ चाचण्यांचे अहवाल, डीएनए चाचणीसाठी बियाणे दिल्याची पावती, कंपनीकडे संशोधन प्रयोगशाळा असल्याचे प्रमाणपत्र अशा प्रमुख नियमांची पूर्तता केल्याशिवाय बियाणे परवाना देऊ नका, अशा स्पष्ट सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com